Friday, April 26, 2024
Homeनगरपीओपीमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण नाही - डॉ. गाडगीळ

पीओपीमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण नाही – डॉ. गाडगीळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पीओपी हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनलेला आहे. पीओपीला चुकीचे ठरवले जात असून ती सुद्धा राजस्थानातील एक माती आहे.

- Advertisement -

त्यावर कुठल्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. भाजणे, दळणे व चाळणे एवढीच प्रक्रिया होते. औरंगाबाद न्यायालय (2011) व गुजरात न्यायालय (2018) ने पीओपीमुळे कुठलेही प्रदुषण होत नसल्याचा निकाल दिला आहे. पीओपीमुळे प्रदूषण होत नसल्याचे शास्त्रीयदृष्टया सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. जयंत गाडगीळ यांनी केले.

केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांच्या जाचक अटींमुळे पीओपी मूर्तींवर बंदी येण्याची शक्यता असून ही बंदी येऊ नये, यासाठी नगर जिल्हा गणेश मूर्तिकार संघटनेच्यावतीने नगरला मूर्तिकार व कारागिरांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजिण्यात आला होता. यावेळी गाडगीळ बोलत होते.

याप्रसंगी राज्य सचिव प्रवीण बावधनकर, कैलास पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत निंबाळकर, उपाध्यक्ष सुशील देशमुख, नारायण वाघ (नंदूरबार), संतोष चिल्लोरकर (अमरावती), रविराज माजगावकर (कोल्हापूर), ज्ञानेश्वर बनकर (परभणी), मधुकर कोकल, संतोष लागशेट्टी (सोलापूर), जगन्नाथ निंबाळकर, गणेश देवतरसे, विनायक लोटके, किशोर रोकडे, गणेश कांबळे, सुधीर लिपारे, ज्ञानेश्वर राजापुरे यांच्यासह महाराष्ट्र व इतर राज्यांतील गणेश मूर्तिकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगर जिल्हा गणेश मूर्तीकार संघटनेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले.

गाडगीळ म्हणाले, पुणे मनपा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा व दगडूशेठ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 2018 साली पीओपी मूर्ती विघटनाचा उपक्रम केला असून, अमोनिया बायकार्बोनेट (खाण्याचा सोडा) मूर्तीच्या वजनाइतका पाण्यात टाकून घरगुती विसर्जन करता येते. त्यापासून तयार होणार्‍या द्रावणाचा उपयोग खत म्हणून करता येतो.

हे सिद्ध झाले आहे. म्हणजे पीओपीमुळे प्रदूषण होत नाही, हे सिद्ध होते. पीओपी हे वैद्यकीय उपचारासाठी वापरले जाते. यावेळी माजी मंत्री आशिष शेलार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. गणेश मूर्तिकारांच्या पीओपीवर बंदी घालू नये, या मागणीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी संघटना व बहुजन वंचित आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे व आभार प्रदर्शन हेमंत कुलकर्णी यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या