Friday, April 26, 2024
Homeनाशिकआनंदरोड मैदानाची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी

आनंदरोड मैदानाची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आनंदरोड मैदानावर (Anand Road Ground) असलेल्या स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा मैदानाची दुरवस्था झाली आहे. मैदानाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक अमोल गोडसे, संसरीचे सरपंच विनोद गोडसे आदींनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये व सदस्य प्रीतम आढाव यांच्याकडे केली आहे…

- Advertisement -

देवळाली कॅन्टोन्मेंट (Deolali Cantonment) हद्दीत आनंदरोड मार्गावरील एकमेव मैदान देवळालीवासियांसाठी उपलब्ध आहे. या शहरातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले असल्याने क्रीडा क्षेत्रात देवळालीचे नाव उच्च स्थानी आहे.

या मैदानावर खा. हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या माध्यमातून पन्नास लाख रुपये खर्चाची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आलेली असून साडे नऊ कोटी रुपये खर्चाच्या क्रीडा संकुलाचा (Krida Sankul) प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे प्रलंबित आहे.

या पार्श्वभूमीवर देवळाली येथील नागरिकांनी व क्रीडाप्रेमींनी द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक अमोल गोडसे, संसरीचे सरपंच विनोद गोडसे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांची भेट घेत मैदानाची झालेली दुरावस्था, वाढलेले गवत याबाबत चर्चा केली.

तसेच बोर्डाच्या नवनिर्वाचित सदस्य प्रीतम आढाव यांचीही भेट घेतली. याबाबत प्रशासन लवकरात लवकर निर्णय घेऊन क्रीडा प्रेमींची मागणी मान्य करत मैदानाची दुरवस्था दूर करणार असल्याचे आढाव यांनी सांगितले, यावेळी विजय गोडसे, भास्कर चौधरी, संतोष गोडसे, अरविंद डांगे, प्रशांत कोकणे, रवी गोडसे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या