Thursday, April 25, 2024
Homeनगरडाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्या

डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्या

राहाता|प्रतिनिधी|Rahata

जिल्ह्यात 20 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या डाळिंब पिकांवर तेल्या रोगाचे संकट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा प्रादुर्भाव वाढल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

मागील वर्षभरात विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना करावा लागला आहे. सातत्याने येणार्‍या विविध नैसर्गिक आपत्तीचा मोठा परिणाम डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना सहन करावा लागला असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.

सद्य परिस्थितीत तेल्या रोगाच्या नैसर्गिक संकटाचा विळखा डाळिंब बागांना बसल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाभळेश्वर कृषी विज्ञान केद्र आणि कृषी विभागाच्या पथकाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मात्र संकटाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने डाळिंब उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचा अहवालही या पाहणी पथकाने दिला असल्याकडे आ. विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमुळे डाळिंब पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादकांना मोठ्या प्रमाणात औषधांचा खर्च करून बागा वाचविण्याची वेळ आली आहे. मात्र डाळिंब पिकांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हे नैसर्गिक संकट थोपविणे उत्पादकांच्या हाताबाहेर गेले आहे.

नगर जिल्ह्यात 20 हजार हेक्टर क्षेत्रावर उत्पादकांनी डाळिंब बागांची लागवड केलेली आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करून या बागा शेतकर्‍यांनी जिवापाड जपल्या आहेत. औषधांचा खर्च करुनही हा प्रादुर्भाव थांबत नसल्याने उत्पादकांनी डाळिंब बागा जमिनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. या बागा नष्ट झाल्यास शेतकर्‍यांचा आर्थिक स्त्रोत थांबणार असून, खर्च झाल्याने शेतकर्‍यांना आर्थिक तोटाही सहन करावा लागेल याचे गांभीर्य आ. विखे पाटील यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

राज्य सरकारने फळपीक विमा योजनेत यावर्षी प्रमाणके व अटी जाचक केल्यामुळे विमा संरक्षणही डाळिंब उत्पादकांना मिळणार नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना विशेष बाब म्हणून आर्थिक मदत जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी आ. विखे पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या