Friday, April 26, 2024
Homeनगरकट्टर राजकीय विरोधकांची भेट

कट्टर राजकीय विरोधकांची भेट

उंबरे |वार्ताहर| Umbare

राजकारणात कोणीही कोणाचा मित्र अथवा कायमस्वरूपी शत्रू नसतो. त्यामुळे राजकारणातील दोन विरूद्ध विचारधारा असलेले राजकीय नेते जेव्हा एकत्र येऊन गळाभेट घेतात,

- Advertisement -

तेव्हा त्या भेटीचे राजकीय तरंग राजकारणाच्या आखाड्यावर उमटतात.

याचा प्रत्यय राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे आला. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्याच्या राजकीय आखाड्यात एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून एकमेकांना आव्हान देणारे तनपुरे व पाटील एकत्र आले.

ज्येष्ठ नेत्यांच्या या भेटीमुळे मात्र, जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या अन् आता चर्चेचे गुर्‍हाळ सुरू झाले. या नेत्यांच्या भेटीला जिल्हा बँकेच्या निवडणुकीची किनार होती. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ज्येष्ठनेते माजी खासदार प्रसाद तनपुरे, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा बँकेचे बिनविरोध निवडून आलेले नुतन संचालक अरूण तनपुरे, ज्येष्ठनेते अ‍ॅड. सुभाष पाटील यांच्या भेटीचा योग वांबोरीत जुळून आला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तालुक्यातील उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्याचे निमित्त साधून माजी खासदार प्रसाद तनपुरे व जिल्हा सहकारी बँकेचे नुतन संचालक अरूण तनपुरे यांनी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी चेअरमन अ‍ॅड. सुभाष पाटील यांची वांबोरी येथील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे वांबोरीसह तालुक्यातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना मोठे उधाण आले आहे.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अरुण तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली. या भेटीदरम्यान झालेली चर्चा सध्या जरी गुलदस्त्यात असली तरी तालुक्यातील दोन मातब्बर नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र, तर्कवितर्कांना मोठे उधाण आले आहे. यावेळी अ‍ॅड पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्ट शब्दात सांगितले.

तालुक्यातील कोणतीही निवडणूक असो, माजी खासदार प्रसाद तनपुरे व अ‍ॅड. सुभाष पाटील यांचे राजकीय हाडवैर सर्वश्रृत आहे. मात्र, जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडीचे औचित्त्य साधून माजी खा. तनपुरे व नुतन संचालक अरुण तनपुरे हे दोन्हीही भाऊ अ‍ॅड. पाटील यांच्या भेटीला गेले. अ‍ॅड. पाटील हे विखे गटाचे कट्टर समर्थक समजले जातात. या भेटीमुळे राहुरी तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असल्याची राहुरी तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या