Buldhana Bus Accident : अपघातातील मृतांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई | Mumbai

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून (Samruddhi Mahamarg Accident) अपघातांचे सत्र अद्याप सुरूच आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील पिंपरखुटा गावाजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Accident) होऊन २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली असून ८ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी (Leaders of Political Parties) अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केला…

Buldhana Accident : समृद्धी महामार्गावर अग्नितांडव; बसच्या भीषण अपघातात 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

बुलढाण्यातील घटनेबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला असून तसे ट्वीट पीएमओ (PMO Office) कार्यालयाने केले आहे. या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेने अतिशय दु:ख झाले आहे. अपघातातील ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबाबरोबर माझ्या प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत, असे त्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच बुलढाणा बस दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून २ लाखांची, तर जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येईल, असेही पंतप्रधान मोदींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत.

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील ट्विट करत या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलढाणा सिंदखेडराजा येथे अपघात होऊन २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे.

अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनाने तज्ञांच्या सल्ल्याने यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेतील जखमी प्रवाशांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो.

Buldhana Accident : “बस डिव्हायडरला धडकली अन् पेट घेतला, आम्ही काचा फोडून…”; बचावलेल्या प्रवाशांनी सांगितली आपबिती

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त करताना म्हटले की, ‘बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात २६ जणांचा दुर्दैवी अंत झाला. हे वृत मन हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत. आता पर्यंत ३०० हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विट करत बुलढाण्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना.

Buldhana Bus Accident : बसचा केवळ सांगाडा उरला, प्रवाशांचा झाला कोळसा… मृतांची ओळख पटवणार कशी?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त करताना म्हटले की, बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बसला झालेल्या अपघाताची दुर्घटना अतिशय भीषण आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. तसेच महामार्गांवर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचे ड्रायव्हर्स आणि ट्रक ड्रायव्हर्स तर कमालीच्या बेदरकारीने गाड्या चालवतात. यावर चाप बसवायलाच हवा. अशा अपघातांच्या घटना परत कधीच होणार नाहीत ह्यासाठी आता प्रयत्न व्हायलाच हवेत.

Buldhana Bus Accident : मुलाला कॉलेजला सोडलं अन् विदर्भ ट्रॅव्हल्स पकडली, बुलढाणा अपघातात आई वडिलांसह मुलीचा मृत्यू

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी बुलढाण्यातील अपघातावर शोक व्यक्त केला आहे. बुलढाणा जिल्ह्यात झालेला रस्ते अपघात विदारक आहे. या दु:खाच्या प्रसंगी मृतांच्या नातेवाईकांच्या प्रती माझी तीव्र संवेदना आहे. जखमींवर प्रशासनाकडून तातडीने उपचार केले जात आहेत. त्यांनी लवकर बरे व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या बस दुर्घटनेचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. या कठीण काळात मृतांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे ही आशा करतो.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

Buldhana Accident : संजय राऊतांचे अपघातावरुन सरकारवर टीकास्त्र; म्हणाले, महामार्ग शापित…