पोलीस सेवेत आता 100 सोबत डायल 112

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा पोलीस दलाच्या सेवेत नव्याने सात वाहने दाखल झाली आहेत. यामध्ये 5 बोलेरो व 2 टीयुव्ही चारचाकी वाहने आहेत.

राज्य शासनाकडून उपलब्ध झालेली ही वाहने पुढील सूचनेनंतर पोलीस दलात सेवेसाठी सज्ज होतील. विविध पोलीस ठाण्यांसाठी ती उपलब्ध करून देण्यात येतील. आता पोलिसांना वाहनांची कमतरता भासणार नाही.

त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळेल. डायल 100 यूजर्सवर कॉल केल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला त्याची माहिती दिली जाते. त्यानंतर पुढील कार्यवाही होते. त्या अनुषंगाने 112 यूजर्सचा वापरही याच पद्धतीने होईल, यामुळे नागरिकांना अधिक जलदगतीने चांगली सेवा मिळेल, असा विश्वास जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह यांनी व्यक्त केला.

पोलीस प्रशासनात नव्याने दाखल झालेल्या 7 चारचाकी वाहनांचे पूजन जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहर उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्राजक्ता सोनवणे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस निरीक्षक अरुण परदेशी आदी उपस्थित होते.

अधीक्षक सिंह म्हणाले, नागरिकांनी 100 यूजर्स नंबरवर कॉल केल्यानंतर ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास मिळतात. त्यानंतर माहिती घेऊन संबंधित पोलीस स्टेशनला कल्पना देऊन पुढील कार्यवाही होते.

यापुढे 100 नंबर बरोबरच 112 यूजर्स नंबरच्या माध्यमातून याच प्रकारची सेवा दिली जाईल. नगर जिल्हा पोलीस दलात वाहनांची संख्या अपुरी असल्याने अडचणी येत होत्या. त्यासाठी पोलीस अधिकार्‍यांनी पाठपुरावा केला. आता राज्य शासनाकडून ही वाहने उपलब्ध झाली झाल्यामुळे अडचणी दूर होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील म्हणाले, एक शून्य शून्य हा नंबर सर्वांनाच तोंडपाठ आहे. मात्र, यापुढे 112 नंबरद्वारे अडचणीत सापडलेल्या नागरिकांची पोलीस तत्काळ मदत करतील. नवीन वाहने मिळाल्यामुळे 112 ही सेवा जनतेसाठी अधिक गतिमान होईल. वरिष्ठांच्या आदेशानुसार ही वाहने सेवेत दाखल होतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *