Thursday, April 25, 2024
Homeनगरतीन पोलीस कर्मचारी लाच प्रकरण; तपास थंडावला?

तीन पोलीस कर्मचारी लाच प्रकरण; तपास थंडावला?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेवगावचे उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या विशेष पथकातील तीन पोलीस कर्मचार्‍याविरोधात लाच मागणीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते कर्मचारी पसार झाले आहेत. त्यांना अटक करण्यात लाचलुचपत विभागाला अजून यश आले नाही. दुसरीकडे उपअधीक्षक मुंढे यांचीही चौकशी लाचलुचपत विभागाने केली. परंतु, कर्मचार्‍यांना अटक झालेली नसल्याने तपास थंडावला आहे. उपअधीक्षकांच्या चौकशी बाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे.

- Advertisement -

एक वाळू वाहतूक करणारी ट्रक उपअधीक्षक मुंढे यांच्या विशेष पथकातील वसंत फुलमाळी, संदीप चव्हाण, कैलास पवार यांनी 7 एप्रिल रोजी पकडली होती. ती ट्रक कारवाई न करता सोडून देण्यासाठी आणि पुढे हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी या पोलिसांनी कंत्राटदाराकडे केली. लाच मागितल्याचा पुरावा एसीबीच्या अधिकार्‍यांना मिळाल्यानंतर त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर हे पोलीस कर्मचारी पसार झाले आहेत. लाचलुचपत विभागाकडून त्यांचा शोध सुरू आहे.

लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी मध्यंतरी उपअधीक्षक मुंढे यांचीही चौकशी केली. तपासाचा भाग असल्याने या चौकशीबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकातील अधिकारी लाच मागत असेल आणि त्यामध्ये त्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची चौकशी होत असेल तर नक्कीच प्रकरण गंंभीर आहे. परंतु पोलीस कर्मचारी पसार असल्याने सध्यातरी या प्रकरणाचा तपास थंडवल्याचे दिसत आहे.

खात्याअंतर्गत चौकशी सुरूच

उपअधीक्षक मुंढे यांच्या पथकातील कर्मचार्‍यांनी लाच मागितल्याने जिल्हा पोलीस दलात हा चर्चेचा विषय झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्या पोलिसांना निलंबीत करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लावली आहे. अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल ही चौकशी करत आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क केला असता चौकशी सुरू असल्याची मोजकी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

गुन्हा दाखल झालेले पोलीस कर्मचारी पसार आहेत. त्यांचा तालुका, जिल्ह्यात शोध घेऊनही ते सापडले नाही. त्यांचे फोन देखील बंद आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींना अटक केल्यानंतरच सर्व बाबी समोर येतील.

– हरीष खेडकर,उपअधीक्षक, लाचलुचपत विभाग

- Advertisment -

ताज्या बातम्या