Friday, April 26, 2024
Homeनगरहरवलेल्या 497 व्यक्तींचा महिनाभरात शोध

हरवलेल्या 497 व्यक्तींचा महिनाभरात शोध

अहमदनगर|Ahmednagar|सचिन दसपुते

जिल्हा पोलिसांनी (District Police) 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2022 दरम्यान राबविलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ (Operation Smile) मोहिमेमध्ये हरवलेल्या, घरातून निघून गेलेल्या 497 व्यक्तींचा शोध घेतला. यामध्ये 69 मुला-मुलींचा तसेच 428 महिला-पुरूषांचा समावेश आहे. शोध घेण्यात आलेल्या व्यक्तींना कुटूंबाच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी (Police) घडवून आणलेल्या या भेटीमुळे त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून हरवलेल्या व अपहरण झालेल्या मुलांसह महिला-पुरूषांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा कुटूंबाच्या स्वाधीन करण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहीम राज्यभरात राबविण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात (Ahmednagar District) 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2022 या कालावधीत मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत रस्त्यावंर, देवस्थान ठिकाणी भीक मागणारी मुले, पालकांशी वाद झाल्यानंतर घरातून निघून गेलेली मुले, अपहरण झालेल्या मुले तसेच हरवलेल्या महिला-पुरूषांचा शोध घेतला जातो. गेल्या महिनाभरात नगर जिल्ह्यात हरवलेली व अपहरण झालेली 69 मुले सापडली. त्यात 59 मुली व 10 मुलांचा समावेश आहे. त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. तसेच घरातून निघून गेलेल्या महिला-पुरूषांचा या मोहिमेत शोध घेण्यात आला. यामध्ये 244 महिला व 184 पुरूष अशा 428 व्यक्तींचा समावेश आहे.

‘या’ पथकाची कामगिरी

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक भिमराव नंदुरकर, पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख, पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे, अर्चना काळे, अनिता पवार, छाया रांधवन, रूपाली लोहाळे, एस. एस. काळे यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कामगिरी केली.

तीन वर्षांत 2063 व्यक्तींचा शोध

दरवर्षी जिल्हा पोलीस दलाकडून एक महिना ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिम राबविली जाते. सन 2020, 2021 आणि 2022 या तीन वर्षांत ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेअंतर्ग एकुण 2063 व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. यामध्ये अपहरणाच्या गुन्ह्यातील 20 मुले, 167 मुली तसेच पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या मिसिंग गुन्ह्यातील 943 पुरूष, 933 महिलांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या