Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यालाच प्रकरणी जिल्हा उपनिबंधकास पोलीस कोठडी

लाच प्रकरणी जिल्हा उपनिबंधकास पोलीस कोठडी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नुकताच निवडून आलेल्या एका बाजार समिती संचालकाकडून ३० लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेलेले जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना १९ मे पर्यंत ‘एसीबी’ कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वकील शैलेश सुमतीलाल साबद्रा यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

लाचलुपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.15) रात्री कॉलेजरोडवरील खरे यांच्या निवासस्थानी रचलेल्या सापळ्यात जिल्हा उपनिबंधक सतीश खरे सापडले होते. याप्रकरणात मध्यस्थी करणारे वकील शैलेश सुमतीलाल साबद्रा यांनाही त्यानंतर ताब्यात घेण्यात आले होते. खरे यांना ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या पथकाने केलेल्या घरझडतीत १६ लाखांची रोकड तसेच ४३ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते.

जिल्हा उपनिबंधक सतीश खरे व वकील शैलेश साबद्रा यांना मंगळवारी दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे (क्रमांक ६) न्यायाधीश आर.आर. राठी यांच्यासमोर हजर करण्यात आले. सरकारतर्फे सहायक अभियोक्ता दीपशिखा भिडे यांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरे यांना १९ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर साबद्रा यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर साबद्रा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. साबद्रा यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अविनाश भिडे यांनी युक्तीवाद केला. साबद्रा यांचा जामीन अर्ज बुधवारी न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दरम्यान जिल्हा उपनिबंधक म्हणून एस.वाय.पुरी यांनी पदभार स्वीकारला असून ते नंदुरबार येथे कार्यरत होते. लाच लुचपत विभागाच्या कारवाईमुळे सहकार विभागात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या