पोलीस आयुक्तांचा मोर्चा वाहतुक व्यवस्थेकडे; मंगळवारपासून चौकांच्या दौऱ्यावर

नाशिक । प्रतिनिधी

करोनाला यशस्वी तोंड दिल्यानंतर आता पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी आपला मोर्चा शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासह वाहतुकीकडे वळवला आहे. त्यांनी शहरातील वाहतुक समस्यांचा अभ्यास सुरू केला असून आता मंगळवारपासून शहरातील विविध चौकांना ते भेटी देणार आहेत…

इतर शहरांच्या तुलनेत नाशिक शहर रस्ते व वाहतुकीच्या दृष्टीने चांगले मानले जात असले तरी आता काही घटकांमुळे शहरातील वाहतुक विस्कळीत झाली आहे. यामध्ये वाढती वाहनसंख्या, अनाधिकृत पार्किंग, कुठेही वाहने पार्क करण्याची सवय, वाहतुक नियमांना तिलांजली, रिक्षाचालकांची मुजोरी, रस्त्यांवरील अतिक्रमण यासह विविध कारणे समोर येत आहेत.

ऐन दसरा व दिवाळी या सनांच्या काळात शहरातील मुख्य बाजारपेठा असलेले रविवार कारंजा, शालिमार, मेनरोड हे रस्ते वाहतुक कोंडीने अडकुन गेले होते. यासह द्वारका, मुंबईनाका, गंगापूर रोडवरील वाहतुक बेटे, तसेच अनेक सिग्नल या भागात वाहतुक कोंडीच्या समस्या निर्माण होत आहेत. यावर उपायोजना करण्याबाबत पोलीस आयुक्तांनी भर देण्यास सुरूवात केली आहे.

विनाकारण वाहनांची आडवणुक करून कागदपत्र तपासणी तसेच महसुल गोळा करण्याचे काम पोलीस विभागाचे नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट करत वाहतुक पोलीसांवरील भार कमी केला आहे. यामुळे वाहतुक पोलीस वाहतुकीसाठी येणारे अडथळे दुर करण्यावरच भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मंगळवार पासून सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळात ते वाहतुक विभागाच्या प्रत्येक विभागात जाणार आहेत. त्या त्या विभागातील चौक, मुख्य सिग्नल, वाहतुक समस्या असलेले भाग यांची पाहणी करणार असून त्या भागातील नागरीकांशीही संवाद साधणार आहेत.

शहरात वाहतुक पोलीसचे चार विभाग कार्यरत आहेत. परंतु वाढती लोकसंख्या व परिसराचा विचार करता हे विभाग तसेच मणुष्यबळ कमी पडत आहे. यामुळे पुढील काळात अजून एक विभाग वाढवण्यावर भर देणार आहोत. यामुळे सर्वांचा परिसर कमी होऊन पुरेसा वेळ देता येणार आहे. सर्व प्रथम शहरातील द्वारका चौकाची पाहणी करणार असून तेथील अडचणी सोडवण्यावर भर असेल.

दिपक पांडे , पोलीस आयुक्त


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *