Friday, April 26, 2024
Homeनगर‘त्या’ अंमलदारांवर कारवाईची टांगती तलवार

‘त्या’ अंमलदारांवर कारवाईची टांगती तलवार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अंमलदारांमध्ये बुधवारी रात्री झालेल्या मारहाणीप्रकरणी चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली. यामुळे ‘त्या’ दोन अंमलदारांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

- Advertisement -

भिंगार पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अंमलदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती. त्यांच्यात बुधवारी रात्री ठाणे अंमलदार कक्षात चांगलाच राडा झाला. ही घटना पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाली आहे. यामुळे पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली गेली. हप्तेखोरीतून हा प्रकार झाल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे. प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. स्टेशन डायरीला नोंद करून चौकशी सुरू केली.

दरम्यान सदर प्रकरणी चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला असल्याचे त्यांनी सांगितले. आता वरिष्ठ अधिकारी यावर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान समाजातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर आहे, त्यांच्यातच हप्तेखोरीसाठी पोलीस ठाण्यातच वाद होत असतील तर यामुळे जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत आहे. सदरची घटना वरिष्ठांनी गांभीर्याने घेतली पाहिजे. या अंमलदारांवर कारवाई झाली नाही तर यातून समाजात वेगळा संदेश जाईल, यात शंका नाही.

प्रभारींचे दुर्लक्ष

दोन पोलीस अंमलदारांमध्ये कुरघोडी सुरू असताना व त्यांची मजल ठाणे अंमलदार कक्षात हाणामारीपर्यंत जात असेल तर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचा अंमलदारांवर वचक नसल्याचे दिसून येते. हप्तेखोरीतून हा वाद झाला असल्याने प्रभारी अधिकार्‍यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या