Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याआनंदवल्ली प्रकरणी पोलिसांनी आवळला फास

आनंदवल्ली प्रकरणी पोलिसांनी आवळला फास

नाशिक । प्रतिनिधी

आनंदवल्ली भूमाफिया मोक्का प्रकरणात नाशिक पोलिसांनी फास आणखीन आवळले असून घटना घडल्यापासून अद्याप फरार असलेले भूमाफिया मुख्य सूत्रधार रम्मी राजपूत व जगदीश त्र्यंबके यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे.

- Advertisement -

आनंदवली येथील शेतकरी रमेश मंडलिक या वृद्धाची जमीन बळकवण्यासाठी नियोजनपूर्व पद्धतीने हत्या करण्यात आली. याच गुन्ह्यात पोलिसांनी पहिल्यांदा भूमाफियांविरोधात महाराष्ट्र संघटीत कायद्यानुसार कारवाई केली आहे. मालमत्ता हडप करण्यास अडसर ठरत असलेल्या रमेश मंडलिक या वृद्ध शेतजमीन मालकाची फेब्रुवारी महिन्यात हत्या करण्यात आली होती.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना संघटीत गुन्हेगारीचे धागेदोरे सापडले. त्यानुसार पोलिसांनी सचिन मंडलिक, अक्षय ऊर्फ अतुल मंडलिक, भूषण मोटकरी, सोमनाथ मंडलिक, दत्तात्रय मंडलिक, नितीन खैरे, आबासाहेब भंडागे, भगवान चांगले, बाळासाहेब कोल्हे, गणेश काळे, सागर शिवाजी ठाकरे, वैभव वराडे, जगदीश मंडलिक, मुक्ता मोटकरी, गोकुळ आव्हाड, अमोल कालेकर, सिद्धेश्वर आंडे, दत्तात्रय सुरवडे यांच्यासह रम्मी आणि जगदीश विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील रम्मी आणि जगदीश वगळता इतर संशयित अटक असून, त्यांना विशेष न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुन्ह्याचा कट रचणे, रमेश मंडलिक यांची हत्या करणे, त्याचे नियोजन आखणे या सर्व प्रमुख गुन्ह्यांमध्ये रमी आणि जगदीशच मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे. मात्र, मंडलिक यांच्या हत्येचे धागेदोरे मिळण्यास सुरुवात झाल्यापासून ते दोघेही फरार आहे. मोक्का प्रकरणाचा तपास करणार्‍या सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांनी फरार संशयितांच्या अटकेसाठी नाशिक जिल्हा न्यायालयातून स्टॅण्डींग वारंट मिळवले आहे.

फरार असलेल्या आरोपींची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे. त्यामुळे पोलिसांनी रम्मी आणि जगदीश या दोघा संशयित आरोपींच्या मालमत्तेची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. सदर गुन्ह्यात हे दोघे आरोपी आणखी काही काळ फरार राहिले तर पोलीस प्रशासनाकडून त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहे. फरार आरोपीची मालमत्ता जप्तीच्या हालचाली सुरू झाल्याने गुन्हेगाराचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या