Thursday, April 25, 2024
Homeनगरभगर खाल्ल्याने राहुरीतील 11 गावांतील 40 जणांना विषबाधा

भगर खाल्ल्याने राहुरीतील 11 गावांतील 40 जणांना विषबाधा

राहुरी फॅक्टरी |वार्ताहर| Rahuri Factory

एकीकडे करोनाने हैराण झालेल्या व जीव मुठीत धरून आपल्या श्रद्धेचा, संस्कृतीचाही वारसा कायम ठेवून

- Advertisement -

नवरात्र उत्सव निमित्ताने उपवास करणार्‍या देवळाली प्रवरा पंचक्रोशीतील पुरूषांसह काही महिलांनीही भेसळयुक्त भगर खाल्ल्याने सुमारे 40 जणांना विषबाधा झाली आहे. लोणी, राहुरी फॅक्टरी येथील रुग्णालयात 16 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 26 जण प्राथमिक उपचार घेऊन घरी गेले.

तालुक्यातील मुसळवाडी, देवळाली प्रवरा, खळी, गंगापूर, शेटेवाडी, चिंचविहीरे, कोल्हार खुर्द, म्हैसगाव, पिंपळगाव फुणगी, गुहा येथील काही किरकोळ दुकानदारांनी त्या राहुरी फॅक्टरीवरील दुकानदाराकडून भगर नेली आहे. ही भगर खाल्ल्याने सुमारे आठहून अधिक महिलांना विषबाधा झाली आहे.

त्या महिलांना लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील तीन महिलांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. एवढी दुर्घटना घडूनही त्या आडमुठ्या किराणा दुकानदाराने पुन्हा खुल्लमखुल्ला त्याच भगरीची विक्री सुरू ठेवली आहे. त्यामुळे या दुकानदाराविरूद्ध कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.

राहुरी तालुक्यातील गंगापूर, खळी, देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी, पिंपळगाव फुणगी, राऊत वाडी व मुसळवाडी येथील महिलांना भगरीमुळे विषबाधा झाल्यानंतर आता राहुरी फॅक्टरी, शेटेवाडी व म्हैसगाव परिसरातील नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. गावातील छोटछोट्या दुकानदारांना भगर पुरविणार्‍या राहुरी फॅक्टरी येथील त्या होलसेल किराणा दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नवरात्र उत्सवास शनिवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र, काही किराणा दुकांनदारांनी ही संधी समजून भेसळयुक्त भगर, साबुदाणा विक्री सुरू केल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. शनिवारी रात्री तीन गावातील 7 ते 8 महिलांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना लोणी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राहुरी फॅक्टरीवरील एका होलसेल दुकानातून मुसळवाडी, खळी, गंगापूर गावामध्ये किरकोळ विक्रेत्यांनी भगर नेली होती. ती भगर संबंधित गावातील महिलांनी विकत नेली. मात्र, रात्री भगर खाल्यानंतर महिलांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे तत्काळ त्यांना लोणीच्या पीएमटीध्ये दाखल करण्यात आले.

राहुरी फॅक्टरी येथील होलसेल किराणा दुकानदाराने परिसरातील अनेक गावातील छोट्या किराणा दुकानदारांना भगर पुरविली आहे. त्या छोट्या दुकानातून खरेदी करणार्‍या नागरिकांनी भगर खाल्ल्यावर उलट्या, जुलाब, पोटदुखी असे त्रास होऊ लागले आहे.

म्हैसगाव येथे काल सकाळी अनेकांना त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना बरे वाटू लागल्यानंतर घरी सोडण्यात आले. राहुरी फॅक्टरी येथील होलसेल किराणा दुकानदारामार्फत अनेक किराणा दुकानदारांना भगर पुरविली गेली.

शेटेवाडी येथील एका किराणा दुकानदाराने तेथूनच विक्रीसाठी भगर नेली होती. याच किराणा दुकानदाराच्या घरच्यांनी भगर नेली. रात्री ती भगर खाल्यानंतर काल सकाळी दुकानदाराच्या आईला त्रास जाणवू लागला असल्याचे समजते. तर शेटेवाडी भागात अनेक महिला व पुरुषांना भगर खाल्ल्याने त्रास सुरू झाला आहे.

राहुरी फॅक्टरी येथील होलसेल किराणा दुकानदाराने पुरविलेल्या भगरीमुळे तालुक्यात अनेकांना विषबाधा झाली. अनेक महिला खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आपल्या भगरीमुळे अनेकांना त्रास झाल्याचे त्या दुकानदाराला समजले. परंतु त्याने कसलेही टेन्शन न घेता आपले दुकान सुरू ठेऊन भगर व भगर पीठ आदीची विक्री जोरदारपणे सुरू ठेवली आहे.

नवरात्र उत्सव शनिवारपासून सुरू झाला असल्याने राहुरी फॅक्टरी येथील बाजारपेठ फुलली आहे. किराणा दुकानांमध्ये नागरिकांची उपवासाचे पदार्थ खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे.

परंतु या नवरात्र उत्सवाच्या काळात काही महिलांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राहुरी फॅक्टरी यांच्या वतीने त्या व्यापार्‍यावर कारवाई व्हावी व नवरात्र उत्सव संपेपर्यंत म्हणजेच विजयादशमी पर्यंत त्या व्यापार्‍याचे दुकान बंद ठेवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने देऊन याबाबत सखोल चौकशी करावी व संबंधित भेसळखोर दुकांनदारावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ही दुर्घटना घडूनही अद्यापही त्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

संबंधित दुकान सील

या प्रकरणाची दखल घेत अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी सील केले असून रात्री उशीरापर्यंत कारवाई सुरू होती. दरम्यान, काल सकाळी राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड महामार्गावरील एका किराणा दुकानदाराकडे भगर परत आणून देणार्‍यांची रांग लागली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या