CNG-PNG दरांबाबत सामान्यांना दिलासा! केंद्र सरकारचा मोठा निर्णय

jalgaon-digital
2 Min Read

दिल्ली | Delhi

वाढत्या महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने गॅसच्या किमतींबाबत किरीट पारिख समितीच्या शिफारशी मंजूर केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सीएनजी आणि पीएनजीसारख्या इंधनाच्या किमती कमी होऊ शकतात, असे मानले जात आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पारंपरिक क्षेत्रातून तयार होणारा नैसर्गिक वायू (APM)आता अमेरिका-रशिया सारख्या कच्च्या तेलाच्या किमतींशी जोडला जाणार आहे. यापूर्वी गॅसच्या किमतीच्या आधारे किंमत निश्चित केली जात होती. आता एपीएम गॅसची किंमत भारतीय बास्केटमधील कच्च्या तेलाच्या किमतीच्या १० टक्के असेल. ही किंमत प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट (MMBtu) ६.५ डॉलरपेक्षा जास्त असणार नाही. मूळ किंमत mmBtu ४ प्रति डॉलर ठेवण्यात आली आहे. सध्याची गॅस किंमत ८.५७ डॉलर आहे.

नवीन फॉर्म्युलामध्ये दोन वर्षांसाठी कमाल मर्यादा कायम राहणार आहे. त्यानंतर प्रति mmBtu ०.२५ डॉलरची वार्षिक वाढ होईल. सीएनजी-पीएनजीचे दर आता दर महिन्याला निश्चित होतील. सध्या दर सहा महिन्यांनी दर निश्चित केले जातात.

गॅस उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त उत्पादनावर २० टक्के प्रीमियम देण्याचा प्रस्ताव आहे. विद्यमान उत्पादकांनी गॅस उत्पादन वाढविल्यास घोषित किमतीव्यतिरिक्त त्यांना २० टक्के प्रीमियमच्या स्वरूपात प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे उत्पादकांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविण्यास प्रोत्साहन मिळेल.

मुंबईत सीएनजीची किंमत प्रति किलो ८ रुपयांनी कमी होईल तर पीएनजीच्या प्रति युनिटसाठी ग्राहकांना ५ रुपये कमी मोजावे लागतील. मुंबईत सध्या सिएनजीची किंमत ८७ रुपये प्रति किलो आहे तर कपात केल्यावर ७९ रुपयांनी तर सध्या पीएनजीची किंमत सध्याच्या ५४ रुपयांपासून ४९ रुपये प्रति किलोवर घसरण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *