Friday, April 26, 2024
Homeनगरमहिला मंडळाच्या प्लास्टिक कचरा संकलन व पुनर्वापराच्या आवाहनास प्रतिसाद

महिला मंडळाच्या प्लास्टिक कचरा संकलन व पुनर्वापराच्या आवाहनास प्रतिसाद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर कचरा मुक्त करण्यासाठी येथील महिला मंडळ, श्रीरामपूरने प्लास्टिक वॉरियर ग्रुपची स्थापना केली असून प्लास्टीक कचरा साठवा-आम्हाला कळवा हे घोषवाक्य घेऊन प्लास्टीक वॉरियर्स प्लास्टीक जमा करण्याचे काम करीत आहेत. महिला मंडळाच्या प्लास्टिक कचरा संकलन व पुनर्वापराच्या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

येथील 80 व्या वर्षांकडे वाटचाल करणार्‍या महिला मंडळाने प्लास्टिक कचरा संकलन आणि पुनर्वापर याची सुरुवात 2018 च्या महिला दिनाच्या कार्यक्रमापासून केली. प्लास्टिकशी विधायक मैत्री या विषयावर मेधा ताडपत्रीकर यांनी मार्गदर्शन केले होते. विविध प्रयत्नानंतर मंडळाने स्वतःच हे काम हाती घेण्याचे ठरवले. कोविडच्या साथीमुळे यात अनेक अडचणी आल्या. यानंतर प्लास्टिक संकलन करायचे ठरवले. त्यासाठी महिला मंडळाने प्लास्टिक वॉरियर ग्रुपची स्थापना केली. प्लास्टिक वॉरियर्सनी स्वतः त्यात आर्थिक योगदान दिले. महिला मंडळानेे तिळगुळ समारंभामधून प्लास्टीक कचरा गोळा करण्यासाठी गोण्यांचे वाटप केले. त्याच्या साहाय्याने प्लास्टिक संकलनाची पहिली फेरी केली गेली. त्याला महिलांनी सावकाश प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. महिलांनी प्लास्टीक कचरा दान या संकल्पनेला प्रतिसाद दिला.

यामध्ये किती प्लास्टिक गोळा होतोय, त्या प्लास्टिकच्या बदल्यात काय मोबदला मिळतोय या सगळ्याची तपासणी केली गेली. ती यशस्वी झाल्यानंतर साधारण महिन्याला एक फेरी अशा पद्धतीने प्लास्टिक संकलन करण्याचे नियोजन करण्यात आले. आतापर्यंत तीन फेर्‍या झाल्या असून चौथ्या फेरीचे 22 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

प्लास्टिक संकलन आणि पुनर्वापर याबाबत जनजागृती व्हावी म्हणून विविध महिला मंडळ, भिशी मंडळ, त्याचबरोबर विविध शाळांमध्ये जाऊन जनजागृती करून प्लास्टीक कचरा संकलन कसे करावे, याची माहिती दिली. घरातील सर्व प्रकारच्या कचर्‍याची विल्हेवाट कशी लावायची याविषयीची जागरूकता करायचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्लास्टिक पासून तयार केलेल्या वस्तूंचं म्हणजे टाकाऊ प्लास्टिकपासून टिकाऊ वस्तू बनवणे ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली. याला विविध शाळांतील मुलांनी प्रतिसाद दिला. जवळजवळ साडे तीनशेच्यावर वस्तू मुलांनी बनविल्या.

भाजी बाजारात जाताना स्वतःची कापडी पिशवी बरोबर घेऊन जावी, कोणीही कॅरीबॅगमध्ये शिळे, खराब झालेले अन्नपदार्थ टाकून कचराकुंडीवर टाकू नये, कारण जनावरांना यापासून धोका निर्माण झाला आहे. प्लास्टीक कचरा साठवा-आम्हाला कळवा हे घोषवाक्य घेऊन प्लास्टीक वॉरियर्स प्लास्टीक कचरा मुक्त श्रीरामपूरचे आवाहन करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या