Thursday, April 25, 2024
Homeनाशिकप्लॅस्टिक मासा देतोय दुष्परिणामांचा संदेश; मानव उत्थान मंचचा उपक्रम

प्लॅस्टिक मासा देतोय दुष्परिणामांचा संदेश; मानव उत्थान मंचचा उपक्रम

नाशिक । प्रतिनिधी

मानवाप्रमाणेच वन्यजीव, समुद्रातील प्राण्यांवर अतिरिक्त प्लॅस्टिक वापराचा विपरीत परिणाम होत आहे. प्लॅस्टिकच्या वाढत्या प्रदूषणाविरोधात मानव उत्थान मंचतर्फे अनोख्या प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे. गंगापूररोडवरील क्रां. व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य माशाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या माध्यमातून प्लॅस्टिक वापर टाळण्याचा संदेश देण्यात येत आहे.

- Advertisement -

मानव उत्थान मंचच्या स्वयंसेवकांनी अथक प्रयत्नातून 55 फूट बाय 25 फूट आकाराचा मासा साकारला आहे. माशाभोवती असलेल्या प्लॅस्टिकच्या घटकांमुळे त्याच्या जीवनावर होणारा परिणाम दाखवताना प्लॅस्टिकमुळे होणार्‍या धोक्यांपासून बचाव करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. सोमवारपासून प्रदर्शन नाशिककरांसाठी खुले करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी प्लॅस्टिक वापराचे नुकसान विविध माहितीपत्रातून दाखवण्यात आले आहेत.

दुसर्‍या टप्प्यात रामकुंड परिसरात प्लॅस्टिक वापराविरोधात जनजागृती करण्यासाठी उद्या बुधवारपासून ते रविवार (दि.15) पर्यंत प्रदर्शन भरवले जाईल. तिसर्‍या टप्प्यात दर आठवड्याला शाळांमध्ये जाऊन प्रदर्शन भरवणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. मानव उत्थान मंचचे जगबिरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प समन्वयक यश भामरे, रोशन केदार, जाकीया शेख, आकाश पटेल, अर्जुन धामे, पंकज जोशी, सृष्टीसिंग, पराग चौधरी, विशाखा भाबड, विकास ठाकरे आदींनी प्रदर्शन उभारणीसाठी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या