Friday, May 10, 2024
Homeनगरपिंपळवाडीत 46 जणांची कोव्हिड चाचणी

पिंपळवाडीत 46 जणांची कोव्हिड चाचणी

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

राहाता तालुक्यातील पिंपळवाडी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर करोनाने उच्छाद मांडला असल्याने आरोग्य यंत्रणेने चांगलेच मनावर घेतले आहे.

- Advertisement -

17 रुग्ण आढळल्यानंतर काल शनिवारी राहाता तसेच पुणतांबा ग्रामीण रुग्णालयात करोना बांधितांच्या संपर्कातील ग्रामस्थांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. पुणतांबा येथे 21 तर राहाता येथे 5 असे 26 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.

पिंपळवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली. यामुळे एकमेकांशी संपर्क आल्याने रुग्ण वाढले असावेत असा आरोग्य यंत्रणेचा संशय आहे. 17 रुग्णांपैकी एका रुग्णाचा दहा दिवसांपूर्वी मृत्यू झाला तर काही जण उपचारानंतर घरी आले आहेत. चार रुग्ण सध्या उपचार घेत आहेत, अशी माहिती सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. श्रीधर गागरे यांनी दिली. नाशिक, श्रीरामपूर आदी भागातील खासगी रुग्णालयांत हे रुग्ण उपचार घेत आहेत.

शुक्रवारी गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, डॉ. संजय गायकवाड, डॉ. श्रीधर गागरे यांनी पिंपळवाडी येथे भेट देऊन माहिती घेतली. ज्या भागात रुग्ण आढळून आले आहेत तो भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. रुई रोड व शिंगवे रोड हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. प्रांताधिकारी यांनी पिंपळवाडीच्या परिस्थितीची माहिती घेतली. ग्रामसेवक प्रेम वाघमारे, तलाठी आदी यावेळी उपस्थित होते.

आरोग्य यंत्रणेने शुक्रवारी पिंपळवाडीच्या विविध भागात जाऊन सर्व्हे केला. सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, सर्व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, समुदाय आरोग्य अधिकारी यांनी घरोघरी जाऊन सर्व्हे केला. रुग्ण पॉईंट आउटसाठी हा सर्व्हे करण्यात आला. मात्र एकही रुग्ण सर्व्हेत संशयित म्हणून आढळून आला नाही.

काही ग्रामस्थांनी खाजगी लॅबमध्ये कोव्हिड चाचणी केली, असे 20 जणांचे अहवाल आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाले आहेत आणि शनिवारी 26 जणांनी चाचणी करवून घेतली. अशा 46 जणांनी चाचणी केली आहे. पैकी 26 जणांचे अहवाल सोमवारपर्यंत प्राप्त होणार आहेत. पल्स पोलिओसाठी तीन बुथ या गावात आहेत. मात्र पल्स पोलिओ लसिकरण ठरल्यावेळी, ठरल्या ठिकाणी होणार असल्याचे डॉ. गागरे यांनी सांगितले. नविन पेशंट आढळून आले नाहीत. त्यामुळे पिंपळवाडी ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. चार पाच दिवसांत नविन रुग्ण आढळून आलेले नाहीत, असे डॉ. गागरे यांनी सांगितले.

पिंपळवाडीला निवडणुकीनंतर 13 व 14 जानेवारी पासून रुग्ण आढळून आले. आरोग्य यंत्रणा चांगले काम करत आहे. त्यामुळे पिंपळवाडीतील रुग्ण संख्या आटोक्यात येईल. ग्रामस्थांनी यंत्रणेने ठरवून दिलेले नियम पाळायला हवेत, असे माजी सरपंच वाल्मिकराव तुकरणे यांनी सांगितले.

निघोजला 5 रुग्ण !

शिर्डी जवळील निघोज येथेही 5 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत. त्यातील तिघांनी उपचार घेतले व दोन जण उपचार घेत आहेत. निघोज येथेही कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. त्यामुळे करोना अजून संपलेला नाही, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकजण आता करोना गेला म्हणून विनामास्क फिरताना दिसत आहेत. मात्र करोना पुन्हा वर डोके काढतो की काय? अशी स्थिती निर्माण झाल्याने काळजी घेण्याचे आवाहन महसूल यंत्रणा, आरोग्य यंत्रणा यांनी केले आहे.

खाजगी लॅबला आदेश !

दरम्यान खाजगी लॅबमध्ये करोना संशयीत करोनाची टेस्ट करतात, रुग्ण पॉझिटीव्ह आला की, तो सरळ खाजगी रुग्णालयात अ‍ॅडमिट होतो. त्यामुळे त्या रुग्णाची माहिती तालुका आरोग्य यंत्रणेला मिळत नाही. हे ओळखून तहसीलदार व आरोग्य विभाग राहाता यांनी खाजगी लॅबवाल्यांना रुग्णांची माहिती महसूल तसेच आरोग्य यंत्रणेला द्यावी, असे पेन्डॅमिक अ‍ॅक्टनुसार आदेश काढले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या