Friday, April 26, 2024
Homeनगरपत्रकारांवर गुन्हा दाखल हा धक्कादायक प्रकार - पिपाडा

पत्रकारांवर गुन्हा दाखल हा धक्कादायक प्रकार – पिपाडा

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी येथील पोलीस ठाण्यात साईबाबा संस्थानच्यावतीने दोन पत्रकारांवर दाखल केलेला गुन्हा हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे.

- Advertisement -

साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे आणि कान्हुराज बगाटे या दोघा जणांनी नुसत्या पत्रकारांनाच नव्हे तर शिर्डी ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिक यांच्यावर दहशत बसावी, यासाठी केलेला हा निंदनीय प्रकार असून अशा एकाधिकारशाही असलेले अधिकारी जर शासनसेवेत असतील तर लोक सुरक्षित राहाणार नाही आणि त्यांना न्याय मिळणार नाही.

त्यामुळे रवींद्र ठाकरे व कान्हुराज बगाटे यांना शासकीय सेवेत ठेऊ नये, अशी मागणी मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे भाजपचे नेते राजेंद्र पिपाडा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

श्री पिपाडा म्हणाले, संस्थानचे अधिकारी हे साईबाबांनी विश्वाला दिलेल्या श्रद्धा आणि सबुरीच्या मंत्राचा अवलंब न करता अत्यंत दडपशाहीने दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत असून याविरुद्ध निश्चितपणे शिर्डी मतदारसंघातील नागरिक आवाज उठतील. संस्थानने भक्तांना सुलभ दर्शन तसेच पिण्याचे पाणी, दर्शन रांगेमध्ये चहा, बिस्किट अशा आवश्यक सुविधा द्याव्यात. त्याचप्रमाणे दर्शन पासेससाठी काळाबाजार चालतो तो तातडीने बंद करण्यात करावा आदी महत्वपूर्ण कामांसाठी संस्थानचे अधिकारी प्रयत्न करताना कधी दिसले नाही असेही श्री. पिपाडा म्हणाले.

शिर्डी हे आंतरराष्ट्रीय आणि संवेदनशील देवस्थान असून या ठिकाणी नम्र स्वभावाचा अधिकारी असावा, लोकांशी त्यांचा सुसंवाद असावा, साईबाबा संस्थानचे नाव खराब होऊ नये, अशी भूमिका येथील अधिकारी वर्गाने घेणे अपेक्षित आहे. मात्र मागील दोन महिन्यापासून त्या ठिकाणी असलेले अधिकारी मनमानी निर्णय घेत आहे. पत्रकारांना व ग्रामस्थांना आतमध्ये जाण्यास बंदी करतात. आत जायचे असेल तर परवानगी घ्यावी लागते, अशी हुकुमशाही पध्दतीने निर्णय घेतले जात आहे, याचा मी निषेध व्यक्त करतो.

अशा एकाधिकारशाही असलेले अधिकारी जर शासनसेवेत असतील तर लोक सुरक्षित राहणार नाही, आणि त्यांना न्याय मिळणार नाही, त्यामुळे रवींद्र ठाकरे व कान्हुराज बगाटे यांच्यावर नुसतीच निलंबनाची कारवाई न करता शासकीय सेवेत ठेऊ नये, अशी मागणी मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे श्री. पिपाडा यांनी सांगितले.

साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे हे पहिले शिर्डी कार्यालयाचे प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना साईबाबा संस्थानमध्ये येण्याचे रहस्य काय? रवींद्र ठाकरे यांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आलेल्या असून ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दिशाभूल करत असून शिर्डी ग्रामस्थांवर खोट्या तक्रारी द्यायला लावून शिर्डीचे वातावरण दूषित करण्याचे काम हे दोन्ही अधिकारी करू पाहात आहे. त्यामुळे या दोन्ही अधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीला पाठवावे.

– राजेंद्र पिपाडा, राहाता

- Advertisment -

ताज्या बातम्या