Thursday, April 25, 2024
Homeनगरछायाचित्र मतदार याद्यांचा पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर

छायाचित्र मतदार याद्यांचा पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)

भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचेकडून 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांना आणि नवीन मतदार म्हणून पात्र असलेल्या मतदारांना संधी देणे तसेच नाव नोंदणी वाढविणे व चुका विरहित मतदार याद्या तयार करणे हा आहे.

- Advertisement -

हा मतदार याद्या पुन:रिक्षण कार्यक्रम 30 सप्टेंबरपासून राबविला जात असून तो 15 जानेवारीपर्यंत राबविला जाणार आहे. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमांतर्गत 17 नोव्हेंबरला एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवमतदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

जिल्ह्यातील मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाली असून प्रत्येक मतदाराने प्रारुप मतदार यादीत नाव आहे किंवा नाही याची खात्री करावी. मतदार यादीत नाव नसल्यास त्यासाठी फॉर्म नमुना-6 म्हणजेच मतदार नांव नोंदणीसाठी आवश्यक नमुना फॉर्म भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्रात जमा करावा. ज्या व्यक्तीचे 1 जानेवारी रोजी वय 18 वर्ष पूर्ण होत आहे, परंतु मतदार यादित नांव नाही, अशा व्यक्तीने आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करुन घेणेसाठी फॉर्म नमुना-6 भरुन द्यावा. ज्या मतदाराच्या मतदार यादीतील तपशिलात (नाव, वय, लिंग, फोटो) इ. मध्ये काही चुका असल्यास त्या दुरुस्त करुन घेणेसाठी फॉर्म नमुना-8 भरुन द्यावा. जिल्ह्याच्या मतदार यादीत मयत, दुबार, स्थलांतरीत मतदारांची संख्या अद्यापही आढळून येत असल्यामुळे त्या नावांची वगळणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदारांनी स्वत: पुढाकार घ्यावा व मयत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीमधून वगळण्याची कार्यवाही करावी. कुंटुंबातील एखादी व्यक्ती मयत झाली असल्यास त्या व्यक्तीचे नांव मतदार यादिमधून वगळण्यासाठी मृत्युच्या दाखल्यासह फॉर्म नमुना-7 भरुन द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासंदर्भात, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यात मतदार यादीत ज्या मतदारांचे नावे दुबार आहेत. अशा दुबार मतदारांनी आपण ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे वास्तव्य करतो, त्या ठिकाणी मतदार यादीत नांव कायम ठेवून उर्वरीत ठिकाणची नावे वगळणेसाठी फॉर्म नमुना-7 भरुन देणे. मतदाराचे जर बदली किंवा इतर कारणामुळे स्थलांतर झाले असल्यास, त्याने पूर्वीच्या ठिकाणच्या नावाची वगळणी करावी व नवीन रहिवासाच्या ठिकाणी नाव मतदार यादीत समाविष्ट करावे. जिल्ह्याच्या मतदार यादिमध्ये ज्या मतदारांचे फोटो नाहीत, अशा मतदारांनी आपला पासपोर्ट साइज फोटो संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे जमा करावा.

महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आवाहन

18 ते 19 वर्षे वयोगटातील मतदारांची नाव नोंदणी वाढविणेसाठी संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी पुढाकार घेउन महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्याचे वय दिनांक 1 जानेवारी रोजी 18 वर्ष पूर्ण झाले आहे, परंतु मतदार यादित नाव नाही अशा विद्यार्थांची नाव नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

विशेष मोहिम घेवून महिलांचे नावे नोंदवा

जिल्ह्याच्या मतदार यादित स्त्री-पुरुष प्रमाण 923 इतके आहे. त्यामुळे महिला मतदारांची नाव नोंदणी वाढविण्यासाठी गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, महिला बचतगट यांनी यासाठी गावोगावी विशेष मोहिम घेउन गावातील ज्या महिलांचे वय 1 जानेवारीला 18 वर्षपूर्ण होत आहे. परंतु मतदार यादीत नाव नाही अशा महिलांची नावे मतदार यादित समाविष्ट करुन घ्यावी, असे पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या