Friday, April 26, 2024
Homeजळगावफार्मसीच्या तरुणीचा मृत्यू : जामनेरात साई हॉस्पिटलची तोडफोड

फार्मसीच्या तरुणीचा मृत्यू : जामनेरात साई हॉस्पिटलची तोडफोड

जामनेर – प्रतिनिधी Jamner

येथील प्रसिद्ध साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालेल्या २२ वर्षीय तरुणीला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना तिचा रस्त्यातच मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची मोठी तोडफोड केल्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

- Advertisement -

दरम्यान, हॉस्पिटलचे डॉ. सुरेश नाईक हे सकाळपासून बेपत्ता झाले आहेत. जामनेर शहरातील प्रकाश नगर येथील रहिवासी दिपाली अर्जुन चौधरी (वय २२) हि फार्मसीच्या पदवी भ्यासक्रमाला शिकत होती. तिला मानेच्या गाठीची समस्या असल्याने साई मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात ५ नोव्हेबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दुपारी त्याच दिवशी ४ वाजता मानेच्या गाठीवर चरबी असल्याचे सांगून तिचे ऑपरेशन साई हॉस्पिटलला झाले. त्यानंतर ५ नोव्हेंबरलाच पुढील उपचारासाठी संध्याकाळी ७ वाजता ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल येथे दाखल केले.

रविवारी ८ नोव्हेंबर रोजी तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला सकाळी ९ वाजता औरंगाबाद येथे नेण्यात येत होते. सिल्लोडजवळ आल्यावर दिपालीची प्राणज्योत मावळली. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी जामनेरात मृतदेह परत आणला.

साई हॉस्पिटलला मृतदेह नेत डॉ. नाईक यांना जाब विचारण्यासाठी गेले. मात्र डॉ. नाईक हे सकाळपासून दवाखान्यात नाहीत हे कळल्यावर संताप आणखीच अनावर झाला. नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या खिडक्या, दरवाजे, स्वागत कक्ष व इतर भागांची मोठी तोडफोड केली. यावेळी निर्माण झालेला तणाव पाहता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

अखेरचे वृत्त हाती आले, तेव्हा पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे हे घटनास्थळी पोहोचले होते. घटनेची माहिती पोलीस घेत असून याबाबत डॉ. नाईक यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान मयत दिपाली चौधरी हिचे आई वडील हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. दिपाली हि सुरेशदादा जैन फार्मसी कॉलेज, जामनेर येथे पदवीच्या अभ्यासक्रमाला शिकत होती. तिच्या पश्चात १ भाऊ आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या