Friday, April 26, 2024
Homeनगरअकोलेच्या फळविहीरवाडीचा बंधारा फुटला

अकोलेच्या फळविहीरवाडीचा बंधारा फुटला

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील एकदरा परिसर व इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात बुधवारी रात्री ढगफुटी सदृश पावसाने थैमान घातले. यामुळे फळविहीरवाडी येथील बंधारा फुटला असून किमान 150 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले आहे. 40 विहिरी गाडल्या असून भात शेती आणि काही घरांचे बंधार्‍याच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. फळविहीर वाडीला जाणारा रस्ता सुद्धा वाहून गेला आहे. ह्या गावासह परिसरातील गावांनाही पावसाचा मोठा फटका बसला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

प्रशासनाने तातडीने ह्या भागातील शेतीचे तसेच इतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना, ग्रामस्थांना युद्धपातळीवर आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, बाळासाहेब गाढवे इत्यादींनी केली आहे. नुकतीच माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी या भागाला भेट देऊन आदिवासी विकास विभागातून मदत करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांना भेटून तसेच मोबाईलवर संपर्क साधून मदत करण्याविषयी आग्रह धरणार असल्याचे श्री. पिचड यांनी म्हटले आहे.

यावेळी अडसरे गावचे सरपंच संतू साबळे, ग्रामस्थांनी डोळ्यात पाणी आणून ‘साहेब आम्हाला या संकटातून वाचवा, सात ते आठ शेतकर्‍यांची शेती नष्ट झाली असून तहसीलदार, तलाठी तसेच शासकीय अधिकारी यांना सूचना करून लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी’, अशी मागणी केली.

ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम कातोरे, रतन बांबळे, हौशीराम कातोरे, साहेबराव बांबळे, भाऊसाहेब गाढवे तसेच परिसरातील सर्व सरपंच यांनी शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन त्यांना दिलासा दिला. सामाजिक कार्यकर्ते यांनी पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी लक्ष घालावे, अशी विनंती केली. खेड जिल्हा परिषद गटातील सर्व भागात मोठे नुकसान झाले असल्याने सर्व शेतकर्‍यांना भरपाई देण्याची मागणी परिसरातून केली जात आहे.

अकोले तालुक्यातील एकदरे, बिताका, म्हाळुंगी, अडसारे येथे ढगफुटी झाली असून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाझर तलाव फळविहीरवाडीचा बंधारा फुटल्याने 150 हेक्टर शेतकर्‍यांचे नुकसान झाले. रस्ता आणि पिके वाहून गेली आहे. अकोले पश्चिम भाग व इगतपुरी पूर्व भागातील सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची परिसरातून मागणी असून सरकारी मदत मिळणे आवश्यक आहे. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून मदतीसाठी आग्रह धरणार आहे.

– मधुकरराव पिचड (माजी मंत्री)

- Advertisment -

ताज्या बातम्या