हरकती असूनही पेट्रोलियम कंपनीचे पोलिस बंदोबस्तात काम सुरू

jalgaon-digital
2 Min Read

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील सुरू असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.ची पाईपलाईन शेतकर्‍यांच्या शेतातून जात असून सदरील शेतकर्‍यांनी दिलेल्या नोटीसींना हरकती घेऊनही बळजबरीने पोलीस बंदोबस्तात पाईपलाईनचे काम सुरू केल्याने संतप्त शेतकर्‍यांनी राहुरी तहसील कार्यालयात धाव घेत तहसीलदारांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, इंडियन ऑईल पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.ची पाईपलाईन आमच्या शेतामधून जाणार आहे. त्याची आम्हाला प्रथम नोटीस सन 2018 रोजी देवून आमची काही हरकत असल्यास नोटीस दिनांकापासून 21 दिवसाच्या आत मनमाड (जि. नाशिक) येथील मुख्य कार्यालयात हरकती दाखल केल्या होत्या. तरीही त्यांनी हरकतींचा विचार न करता काम चालू केले आहे. अहमदनगर येथील श्रीगोंदा तालुका व पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्रमगड या तालुक्यातून रिलायन्स गॅस पाईपलाईन गेलेली आहे. त्यांना 2017 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक घेवून त्या लोकांना प्रत्येकी गुंठा 59,840 रुपये देण्याचे आदेश दिलेले आहे.

त्या लोकांना सुद्धा 1962 चा पेट्रोलियम कायदा याप्रमाणे नोटीस दिलेली आहे. व राहुरी तालुक्यातून इंडियन ऑईल पेट्रोल पाईपलाईनला सुद्धा 1962 चा कायदा लागू केलेला आहे. तरी आम्हाला इंडियन ऑईल पेट्रोलियम कंपनी केवळ 3800 रुपये प्रती गुंठा देत आहे. तसेच आमच्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचा पंचमाना, कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता मौजे लाख, ता. राहुरी येथे पोलीस बंदोबस्तात हुकुमशाहीने काम चालू केले आहे. आम्ही सर्व शेतकरी मिळून ना. बच्चूभाऊ कडू यांना दि.29 ऑक्टोबर 2021 रोजी संबंधीत अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याचे निवेदन दिलेले आहे. तरी पुढील आठ ते दहा दिवसात बैठकीचे नियोजन आहे. तरी त्या बैठकीचा निर्णय येईपर्यंत आमच्या शेतातील तात्पुरत्या स्वरूपात काम बंद ठेवावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे, आप्पासाहेब करपे, अर्जुनराव करपे, प्रशांत सगळगिळे, प्रशांत पवार, गणपत काकडे, श्रीराज शेख, बाबासाहेब दुकळे, जालिंदर बेडके, आण्णासाहेब गाडे आदींसह लाख, टाकळीमिया व त्रिंबकपूर आदी ठिकाणच्या शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *