पेरूचे बाजार गडगडले, शेतकरी आर्थिक अडचणीत

jalgaon-digital
3 Min Read

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

पेरूचे दर गडगडल्याने राहाता तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकर्‍यांची दिवाळी अडचणीत आली आहे. सरकारकडून पेरू उत्पादक शेतकर्‍यांना मदतीची आशा आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून पेरूचे दर गडगडल्याने राहाता तालुक्यातील हजारो पेरू उत्पादक हवालदिल झाले असून विक्रीतून उत्पादन खर्चही सुटत नसल्याने करायचे काय अशी चिंता त्यांना सतावत आहे.

स्थानिक तसेच राज्याच्या बाजारपेठेत व परराज्यातही मागणी कमी असल्याने पेरू उत्पादकांना मोठा फटका बसल्याने या वर्षाचा हंगामच वाया जात असून दोन दिवसावर आलेली दिवाळी करायची कशी अशी चिंता या शेतकर्‍यांना भेडसावत आहे.

हमखास नगदी पैसा मिळवून देणारे पेरू पीक असल्याने राहाता तालुक्यात हजारो एकरावर पेरूची शेती पिकविली जाते. यातून चांगले उत्पन्न मिळते. या पेरू बागांवर वाहन चालक, मजूर, बागवान या लाखो लोकांचा संसार चालतो. मात्र यावर्षी करोनामुळे सर्वत्र बाजारपेठा, मंदिर व शाळा बंद असल्याने पेरूची मागणी घटली. त्यातच सततच्या मुसळधार पावसामुळे व बागांमधे चार महिने साचून राहिल्याने पेरू बागांना अनेक रोगांनी ग्रासले.

फळ गळाली, मुळ्या सडल्या, मोठ्या प्रमाणावर औषध फवारणी व मजुरी वाढली. मात्र मागणी घटल्याने 20 किलो पेरूच्या कॅरेटला अवघा 100 ते 150 रूपये दर मिळत असल्याने हे पीक परवडेनाशे झाले. यातून औषध व मजुरीही फिटत नसल्याने वर्षभराचे आर्थिक वेळापत्रकच कोलमडून गेले.

उत्पादन व उत्पन कमी मात्र खर्च जादा यामुळे पेरू उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला असून पेरू बागांवर केलेला लाखो रूपयाचा खर्च वसुल कसा होणार व कुटूंबाचा खर्च कसा भागवनार ही चिंता भेडसावत आहे.

पेरू उत्पादक शेतकर्‍यांवर मायबाप सरकारही उदासीन झाले असून हवामान आधारीत पिक विम्याचे निकष कडक केल्याने हजारो शेतकर्‍यांनी यावर्षी पीक विमा भरला नाही. मुसळधार पावसाने पिकाचे होतेच्या नव्हते केले. मात्र सरकारने भरपाईतून पेरू बागा वगळल्याने शेतकर्‍याला कुणाचाच आधार उरला नाही.

सरकारने पेरू उत्पादक शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी व या संकटातून त्यांना सावरण्यासाठी आधार द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहे.

पेरू उत्पादक शेतकरी करोना व अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडला असून शासनाने तातडीने या शेतकर्‍यांना मदत करावी. तसेच मागील वर्षी निकषात असताना विमा कंपन्यांनी पेरू उत्पादक शेतकर्‍यांना विम्याची नुकसान भरपाई दिली नाही. त्याची चौकशी करून ती भरपाई शेतकर्‍यांना मिळवून द्यावी तसेच पीक विम्याचे निकष शिथील करावे म्हणजे त्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळेल. हवामान आधारीत पीक विमा हा शेतकर्‍यांसाठी लाभदायक असावा सध्याचे निकष म्हणजे विमा कंपन्यांसाठी लाभदायक असल्याची टिका पेरू उत्पादक शेतकरी माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांनी केली.

करोनामुळे बाजारपेठा, शाळा, कॉलेज व मंदिर बंद राहिली. ही सर्व ठिकाणे पेरू विक्रीची प्रमुख केंद्रे होती. तसेच जादा आवक होऊ लागल्यावर व्यापारी रिंग करून बाजारभाव पाडतात व स्वतःचे खिसे भरतात. याचा फटका शेतकर्‍यांना बसतो. सरकारने पेरू प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असून पेरू फळावर प्रक्रिया करणारे उद्याग वाढविण्याची गरज असल्याचे मत अखिल भारतीय पेरू उत्पादक महासंघाचे अध्यक्ष विनायक दंडवते यांनी व्यक्त केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *