Tuesday, April 23, 2024
Homeनाशिककळवण, सुरगाणा तालुक्यात भरडधान्य केंद्रांना परवानगी

कळवण, सुरगाणा तालुक्यात भरडधान्य केंद्रांना परवानगी

कळवण । प्रतिनिधी Kalwan

शासनाच्या आधारभूत किमतीत कळवण तालुक्यात 4 व सुरगाणा तालुक्यात 7 अशा मतदार संघात 11 मका व भरडधान्य केंद्र सुरु करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे.

- Advertisement -

आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नातून कळवण तालुक्यातील देसराणे, जयदर येथे आदिवासी विकास महामंडळाकडून तर दळवट, विसापुर येथे सहकारी संस्थेमार्फत तर सुरगाणा तालुक्यात सुरगाणा, बोरगांव, हातरुडी, भवानदगड, काठीपाडा, चिंचपाडा, बार्‍हे येथे आदिवासी विकास महामंडळाकडून आधारभूत किमतीत खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. आमदार नितीन पवार यांनी याबाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.

कळवण व सुरगाणा तालुक्यात बाजार समित्यासह खाजगी बाजारात मक्याला शासकीय हमीभावापेक्षा तब्बल 500 ते 600 रुपये कमी दर मिळत असल्याने गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा विळखा व मका पिकाचे नुकसान या दुहेरी संकटामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याने हमीभावापेक्षा कमी दराचा भुर्दंड सहन करावा लागतो.

केंद्राच्या किमान आधारभूत किमंत धान्य योजनेंतर्गत राज्यात मका खरेदीस परवानगी देण्यात आल्याने सध्या योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे . कळवण तालुक्यातील 18 हजार हेक्टर क्षेत्रावरील सध्या मोठ्या प्रमाणात मक्याची काढणी झाली असून शेतकर्‍यांची किमान हमीभावाच्या खरेदीने मक्याला भाव मिळावा अशी अपेक्षा होती. त्याअनुषंगाने कळवण व सुरगाणा तालुक्यात हमीभावाने मका तसेच भरडधान्य खरेदी केंद्र करावे यासाठी आमदार नितीन पवार यांनी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

यावेळी आ. नितीन पवार यांनी सांगितले की, मकाला बाजार समित्यांसह खासगी बाजारात 1200 ते 1400 दर मिळत आहे. चालू हंगामातील उत्पन्न देणारे मक्याचे पहिले पीक निघाल्याने शेतकरी आर्थिक अडचण भागविण्यासाठी या अल्प भावातही मक्याची विक्री करत आहे. दर्जेदार उत्पादन यंदा तालुक्यात झाले. यंदा हमीभावात वाढ करून 1850 रुपये दराने खरेदीचा निर्णय शासनाने घेतल्याने शेतकर्‍यांना मोठा आधार मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या