गरज ‘संयुक्तिक’ प्रयत्नांची

jalgaon-digital
8 Min Read

डॉ. नानासाहेब थोरात, ऑक्सफर्ड विद्यापीठ, इंग्लंड

कोरोना काळात भारतात औषधोपचार खूप मोठ्या प्रमाणावर झाले; पण अखेर लसीकरणातील भरारीमुळे आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो. पण इथवर येईपर्यंत एका अनाहुत वाद जो अनेक वर्षांपासून चालत आला आहे त्याचीही बरीच चर्चा झाली. तो म्हणजे आयुर्वेद की अ‍ॅलोपॅथी. वास्तविक, कोव्हीडसारख्या महामारीवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळविण्यासाठी आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी या दोन्ही शास्त्रांनी एकत्र येण्याची गरज आहे. आपल्याकडे याउलट परिस्थिती तयार झाली आहे. चीनमधील शास्त्रज्ञांनी त्यांच्या जंगलात असणार्‍या औषधी वनस्पतींचे आयुर्वेदिक गुणधर्म मॉडर्न अ‍ॅलोपॅथीशी जुळवून मलेरियावरील औषध शोधले आणि त्यासाठी त्यांनी नोबेल पुरस्कार पण मिळवला. आपणसुद्धा या दोन्ही शास्त्रांना एकत्र आणले आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाही जोड दिली तर कॅन्सर, मधुमेह, यासारख्या आजारांवर कायमस्वरूपी उपाय शोधू शकतो.

कोरोनाच्या काळात आरोग्यक्षेत्र ढवळून निघताना दिसले. एका बाजूला रुग्णालयांमध्ये दिल्या जाणार्‍या रेमडेसीवीर औषधाविषयीचे वाद-प्रवाद दिसून आले; तर दुसरीकडे नागरिकांनी केलेल्या घरगुती उपायांमुळे कोविड नियंत्रणात राखण्यात यश आले, अशी चर्चाही दिसून आली. अंतिमतः यातून आयुर्वेद की अ‍ॅलोपॅथी या जुन्या वादाला तोंड फुटले. लेखाच्या सुरवातीलाच माझे एक मत स्पष्ठ करतो कि जसे अ‍ॅलोपॅथीचा कोणी एक मालक नाही तसाच आयुर्वेदाच्या बाबतीत आहे.

आयुर्वेद ही निरीक्षणावर आधारित पद्धती आहे, प्राचीन काळी मनुष्याला होणारे आजार त्यांची नैसर्गिक उगमस्थाने आणि त्या आजारांवर निसर्गामध्येच असणारे उपचार यावर आयुर्वेद विकसित होत गेले.

आयुर्वेद हे कोणत्याही एका देशाचे सुद्धा नाही, जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, यूरोपियन देश, आफ्रिकन देश तसेच ब्राझील, अर्जेंटिना, पेरू या देशांमध्ये सुद्धा अनेक आजरांवर निसर्गातीलच घटक (जंगलातील वनस्पतीचा पाला, मुळ्यांचा रस, भाजीपाला) यांचा वापर करून उपचार केले जातात. जापनीज-कोरियन लोक तर रोजच्या जेवणात मासे आणि भाज्यांचा रस घेतात, त्यांचे सरासरी वयोमान 80 वर्षे आहे. मग माशाला सुद्धा आयुर्वेदिक म्हणायचे का? ते मासे खाऊन 80 वर्षे जगतात तर आपण भाजीपाला खाऊन 60 वर्षे. अ‍ॅलोपॅथीचा उगम हा सुद्धा नैसर्गिकच आहे, अ‍ॅलोपॅथीचे एकही औषध असे नाही की जे नैसर्गिक घटकांपासून बनवले नाही.

प्रयोगशाळेत 100 टक्के कृत्रिम असे कोणतेच औषध तयार करता येत नाही. त्याचे काही घटक हे वनस्पती किंवा प्राण्यांपासूनच येतात. एखादा आजार बरा करण्यास मोठ्या प्रमाणात नैसर्गिक पदार्थ घ्यावे लागतात, त्यातील काहीच घटक आजार बरे करू शकतात. मात्र त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात नैसर्गिक पदार्थ खावे लागतात, त्यामधील इतर घटक बाजूला करून फक्त उपयोगी असा अंश बाजूला करून प्रयोगशाळेत आहे तसा निर्माण करणे आणि योग्य प्रमाणात शरीरात पाठवणे म्हणजेच अ‍ॅलोपॅथी.

उदाहरणच द्याचे झाले तर गर्भवती महिलांना सुरवातीपासून ओमेगा-3 गोळ्या दिल्या जातात, यामुळे गर्भातील बाळाच्या मेंदूची वाढ चांगल्या प्रमाणात होते. ओमेगा-3 चे मूळ उगमस्थान हे समुद्रातील माशांचे तेल किंवा अक्रोड आहे. समजा जर एखाद्या गर्भवतीने ठरवले की मी डॉक्टरांनी दिलेल्या ओमेगा-3 च्या गोळ्या खाणार नाही आणि नैसर्गिक स्रोतांपासून मिळणारेच ओमेगा-3 घेईन, तर त्या स्त्रीला तेवढ्याच प्रमाणात ओमेगा-3 मिळवण्यासाठी संपूर्ण शार्क मासा खावा लागेल किंवा एक ट्रक भरून अक्रोड खावे लागतील. हे शक्य आहे का? नाही, म्हणूनच अ‍ॅलोपॅथीचा उगम झाला. डॉक्टर रोजच्या रोज जी अ‍ॅलोपॅथीची औषधे वापरतात ते सगळे नैसर्गिक स्रोतांपासूनच आलेला असतात. शस्त्रक्रिया करताना रुग्णांना कमी आणि जास्तवेळासाठी जी भूल दिली जाते त्याचे औषध ब्राझीलमधील अमेझॉनच्या जंगलातील वनस्पतींच्या खोडातील रसांपासून केले जाते. आज रोजी जी अ‍ॅलोपॅथीची औषधे वेगवेगळ्या आजारांसाठी उपलब्ध आहेत त्याचे मूळ रासायनिक संयुग किंवा अंश हे 70 हजारांहून अधिक वनस्पतींच्या पासून मिळविले आहेत. कॅन्सर वरती वापरली जाणार्‍या सर्वच औषधांचे मूळ रासायनिक संयुग हे वनस्पतींपासूनच मिळविले आहेत.

असे असले तरी आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी या दोन्ही शास्त्रांना मर्यादा आहेत, आयुर्वेद किंवा नैसर्गिक पदार्थ यांचा सर्वच आजारांवर मर्यादित परिणाम दिसून येतो. म्हणूनच अ‍ॅलोपॅथीचा उगम झाला. आपल्या बोटाला ब्लेड कापले की आपण लगेच तिथे हळद लावतो. काही वेळातच तेथील रक्त वाहण्याचे थांबते आणि पुढच्या दोन दिवसात झालेली जखम भरून येते. समजा जर आपले बोटेच कापले असेल तर? त्यावेळी हळदीचा काहीही परिणाम होत नाही. याउलट हळदीचे मूळ रासायनिक गुणधर्म वापरून अ‍ॅलोपॅथीने तयार केली औषधेच परिणामकारक ठरतात. कॅन्सरसारखा आजार तिसर्‍या किंवा चौथ्या टप्प्यात असताना समजतो अशा वेळी कोणतीही आयुर्वेदिक औषधे परिणामकारक ठरत नाहीत. एवढेच काय तर अ‍ॅलोपॅथीची औषधे सुद्धा 5 ते 10 टक्केच परिणामकारकता दाखवतात. जगात कोणताच आयुर्वेदिक किंवा अ‍ॅलोपॅथीक डॉक्टर 100 टक्के खात्रीने सांगू शकत नाही कि आमची उपचारपद्धती कॅन्सर संपूर्णपणे बरा करते.

इथे दोन्ही शास्त्रांच्या मर्यादा स्पष्ठपणे दिसून येतात. मुळातच ज्याला आपण आयुर्वेद म्हणतो ते एखादा आजार भविष्यात होऊ नये म्हणून केली जाणारी उपचारपद्धती आहे तर अ‍ॅलोपॅथी हि तो आजार झाल्यानंतर बरा करणारी उपचारपद्धती आहे. समजा अ‍ॅलोपॅथीचे औषध घेऊन आपण न्यूमोनिया बरा करू शकतो पण तेच औषध घेऊन भविष्यात होणार न्यूमोनिया रोखू शकत नाही. यासुद्धा दोन्ही उपचारपद्धतीच्या मर्यादा आहेत.

दुसरा एक मोठा गैरसमज आहे की आयुर्वेदिक औषधांचे कोणतेही दुष्परिणाम (साईड इफेक्ट) नसतात. ते फक्त अ‍ॅलोपॅथीक औषधांचेच असतात, हे संपूर्णतः सत्य नाही. संपूर्ण पृथीवर असा कोणताही पदार्थ नाही ज्याचे दुष्परिणाम नाहीत, फक्त त्याची योग्य ती मात्रा ठरवून ते कमी जास्त केले जातात. जसे अ‍ॅलोपॅथीक औषधांचे परिणाम लगेच दिसून येतात तसेच त्यांचे दुष्परिणामपण कमी वेळात दिसून येतात. आयुर्वेदिक औषधांचे पण तसेच आहे त्यांचे परिणाम जसे वेळाने दिसून येतात त्याच वेळाने त्यांचे दुष्परिणामपण दिसून येतात. दुष्परिणाम खूप वेळाने दिसून आल्यामुळे ते नक्की कशाचे आहेत हे समजून येत नाहीत. उदाहरणच द्यायचे झाले तर जी हळद लावून आपण आपली त्वचा उजळ करतो तीच हळद सतत लावली तर पेशींमध्ये रासायनिक क्रिया करून पेशींना जखम करते आणि त्यामुळे काही दिवसांनी अंगाची खाज, त्वचा लाल होणे किंवा सूज येणे असे दुष्परिणाम करते.

आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी यांनी एकत्र येण्याची गरज

कोव्हीडसारख्या महामारीवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळविण्यासाठी आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी या दोन्ही शास्त्रांनी एकत्र येण्याची गरज आहे आपल्याकडे याउलट परिस्थिती तयार झाली आहे. चीनमधील शास्त्रज्ञांनी त्यांच्या जंगलात असणार्‍या औषधी वनस्पतींचे आयुर्वेदिक गुणधर्म मॉडर्न अ‍ॅलोपॅथीशी जुळवून मलेरियावरील औषध शोधले आणि त्यासाठी त्यांनी नोबेल पुरस्कार पण मिळवला.

आपणसुद्धा या दोन्ही शास्त्रांना एकत्र आणले आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाही जोड दिली तर कॅन्सर, मधुमेह, यासारख्या आजारांवर कायमस्वरूपी उपाय शोधू शकतो. अ‍ॅलोपॅथीचे उपचार ज्या शास्त्रीय कसोटीतून जातात जर आयुर्वेदिक उपचारसुद्धा त्याच कसोटीतून गेले तर कदाचित ते अ‍ॅलोपॅथीच्या औषधांपेक्षा अधिक उपायकारक ठरतील. पण आयुर्वेदाला मानणारे अशा शास्त्रीय कसोटींना विरोध करतात. दुर्दवाने औषधांच्या बाजारीकरणातून कमी वेळात येणार्‍या पैशामुळे दोन्ही क्षेत्रातील लोक खोटे दावे करून कमी वेळात लोकांच्या आरोग्याचा विचार न करता धंदेवाईक झालेत. जसे आयुर्वेदाकडे कॅन्सर, मधुमेह, बॅक्टरीया आणि बुरशीजन्य रोग यावर खात्रीशीर उपचार नाही तसा तो अ‍ॅलोपॅथीकडे पण नाहीत, हे सत्य दोन्ही क्षेत्रांनी स्वीकारलेच पाहिजे. दरवर्षीं जगभरात एक लाख कोटीपेक्षा अधिक संशोधन निधी हा एकट्या कॅन्सरवरच्या संशोधनाला दिला जातो तरीसुद्धा अ‍ॅलोपॅथीकडे कॅन्सरचे 100 टक्के हुकमी औषध नाही. तसेच कॅन्सर होणारच नाही याचे 100 टक्के हुकमी औषध आयुर्वेदाकडे पण नाही. यावर दोन्ही बाजूंनी विचार केलाच पाहिजे आणि अंतिम सत्य स्वीकारलेच पाहिजे.

(लेखक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड येथील मेडिकल सायन्स डिव्हिजनमध्ये मेरी क्युरी वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *