राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता तालुक्यातील केलवड येथील दोन तरुणांनी जखमी अवस्थेत असलेल्या दुर्मिळ अशा बहिरी ससाणा या पक्षाला वेळीच उपचारासाठी नेल्याने या पक्षाला जिवदान मिळाले आहे.
केलवड येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयापासून काही अंतरावर केलवड दहेगाव रोडवर एका वाहनाला धडकून बहिरी ससाणा जखमी होवून रस्त्यावर पडला होता. त्यावेळी केलवडहुन राहात्याकडे रावसाहेब संतु सोनवणे व वामन कचरु सोनवणे हे दोघे आपल्या दुचाकीवरुन जात असताना त्यांनी पाहिले. त्यांनी या पक्षाला वाचविण्यासाठी केलवड मधील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले परंतु तेथे दवाखाना बंद असल्याने त्यांनी जखमी अवस्थेतील बहिरी ससाणा पक्षाला तालुका लघु पशुसर्वचिकित्सालय राहाता येथे उपचारासाठी नेले. त्याच्यावर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. शैलेश बन तसेच डॉ. भारत कापडी व डॉ. नितीन निर्मळ यांच्या उपस्थितीत प्राथमिक उपचार करण्यात आले. उपचारानंतर पक्षाला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
डॉ. शैलेश बन म्हणाले, बहिरी ससाणा हा भारतात अतिशय दुर्मिळ पक्षी असून ससाणा जातीतील शिकारी पक्षी आहे. गडद हिरव्या रंगाचे टोकदार पंख, चपळ शरीर व अतिशय वेगवान हालचाली करून उडणार्या पक्ष्यांची शिकार करण्यात पटाईत आहे. डोळ्याच्या बाजूचे पिसांचे कल्ले यांवरून हा पक्षी ओळखता येतो.
एकेकाळी हा पक्षी अतिशय दुर्मिळ झाला होता. परंतु 70 ते 80 च्या दशकात या पक्ष्याच्या संख्येने पुन्हा उचल घेतली आहे. दुर्मिळ होण्याचे मुख्य कारण डीडीटी या कीटकनाशकाचा मोठ्या प्रमाणावरील वापर होता. अशा या पक्षाला रावसाहेब सोनवणे व वामन सोनवणे या दोघांमुळे जिवदान मिळाले. या दोघांचे केलवड येथे कौतुक होत आहे.