Tuesday, April 23, 2024
Homeनगरलोकसहभागाने केलेल्या प्रयत्नाने चित्र बदलू शकेल..दुष्काळावर होणार मात

लोकसहभागाने केलेल्या प्रयत्नाने चित्र बदलू शकेल..दुष्काळावर होणार मात

संगमनेर |Sangmner

अवतीभोवती पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत. इतर गावांच्या विहीरींचे पाणी उंचावले आहे, पण गावाशेजारी असणार्‍या नदीचे पाणीही वाहत असताना

- Advertisement -

शेतीला फायदा मिळेनासा झाला. शेती अडचणीत सापडली. पाचवीला दुष्काळ पुजल्यासारखे चित्र निर्माण झाले. मात्र तरुणाईने एकत्र येत लोक वर्गणीचे संकलन करून पाच एकरच्या गाव तळ्यात पाणी आले आणि आता गाव दुष्काळमुक्त होऊन हिरव्यागार पिकांनी फुलेल असा आशावाद व्यक्त होऊ लागला. प्रत्येक वेळेस शासनावर अवलंबून राहण्यापेक्षा आपणच आपल्या विकासाची चाके गतीने फिरवायला हवीत म्हणून केलेल्या प्रयत्नाने चित्र बदलू शकेल.

आढळा परिसरातील निमगाव भोजापूर ची यशोगाथा.. 1973 ला गावातील दुष्काळ हटवण्यासाठी गाव तळ्याची निर्मिती करण्यात आली. काहीकाळ गावकर्‍यांनी शेतीसाठी आधार दिला, मात्र पावसाचे प्रमाण कमी होत गेले आणि तळ्यातील पाणी आटत गेले. दोन हजार फुटावरून म्हाळुंगी वाहते आहे. मात्र पात्राचा परिसर पूर्णतः खडकाळ असल्यामुळे डोळ्यादेखत पाणी वाहत जात आहे.

त्याचा परिसराला फायदा होत नाहीत ही बाब लक्षात घेऊन नदीचे पाणी गाव तळ्यात आणावे असे प्रयत्न झाले. कधी सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून, कधी शासनाच्या पातळीवरून पण प्रयत्नाना फारसे यश आले नाही. दोन हजार फुटाचे अंतर फारसे नाही, पण नदीचे पात्र आणि गाव तळ्याचे पात्र यांना जोडण्यासाठी मध्ये असणारी टेकडी तोडणे कठिण काम होते. सुमारे 50 फूट टेकडी तोडून सम पातळीवरून गाव तळ्यात पाणी सोडावे लागणार होते. त्यामुळे त्यास नकार मिळत गेला आणि पाणी आले नाही.

गेल्या दोन-तीन वर्षात गावाला पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली. आता काही तरी प्रयत्न करण्याची गरज आहे ही बाब लक्षात घेऊन गावातील तरुण एकत्र आली आणि लोकवर्गणी गोळा करायला सुरुवात झाली. पाहता पाहता अडीच लाख रुपयांची वर्गणी गोळा झाली. या पैशाच्या माध्यमातून टेकडी तोडण्यात आली आणि नदीचे पाणी गाव तळ्यात साचू लागले. पाच एकरचे गाव तळे आता भरले आहेत.

त्या पाण्याचा लाभ संपूर्ण गाव शिवारला होईल आणि गाव पुन्हा हिरवेगार होईल असे मत तरुणांनी व्यक्त केले. या कामासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आ. सुधीर तांबे, इंद्रजित थोरात, नवनाथ आरगडे, वनविभागाचे उपवन अधिकारी श्री माळी, पर्यवेक्षक श्री. पारधी यांनी विशेष सहकार्य केले. या कामासाठी गावातील तरुण रवीराज सोनवणे, प्रवीण गांडुळे, प्रवीण कडलग, स्वप्नील कडलग, तेजस कडलग, अमोल कडलग, संदीप वलवे, यांच्यासह गावातील तरुणांनी सहकार्य केले.

निमगाव भोजापूर येथील तरुणांनी एकत्र येऊन, गावकर्‍यांनी पैसे एकत्रित करून केलेले काम अत्यंत आदर्शवत आहे. आपल्या विकासासाठी आपण पुढे येणे आवश्यक असून या तरुणांनी गेले तीस वर्षापासूनच्या कामाची असलेली प्रतीक्षा संपवत गावच्या विकासासाठी उचलेल पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे. पंचायत समिती स्तरावर गावच्या विकासासाठी पूर्णतः सहयोग देण्यात येईल.

– नवनाथ अरगडे, उपसभापती, पंचायत समिती संगमनेर

गावच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 विहिरी आहेत. साडेतीनशे हेक्टर क्षेत्र आहेत. त्यादृष्टीने पाण्याचे स्त्रोत निर्माण होण्यासाठी गाव तळे उपयोगी पडणार आहे .गाव तळे पाच एकरचे असून सध्याची खोली बारा ते पंधरा फूट असून येत्या काही दिवसात ही खोली वाढून तीस ते चाळीस फुटापर्यंत नेण्यात येईल. त्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढेल. या तळ्यातून गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघणार आहे. यापूर्वी देवठाण धरणातील पिण्याचे पाणी आणण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी 21 कोटी रुपये लागणार होते. मात्र आता तळ्यात पाणी साठवले गेल्याने गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर जिवंत होणार आहे. त्याचा लाभ होईल. तसेच निमगाव भोजापूर सोबतच राजापूर, चिकणी, सायखिंडी गावातील काही क्षेत्राला त्याचा लाभ होईल.

– प्रवीण गांडोळे

गेले तीस-पस्तीस वर्षांपासून हे काम घडावे म्हणून प्रयत्न सुरू होते. प्रत्येक वेळी काही ना काही अडचणी येत होत्या. मात्र गेले दोन वर्ष तीव्र दुष्काळात सामोरे जावे लागले. त्यामुळे कोणताही पर्याय शिल्लक नाही ही बाब लक्षात आल्यावरती कोणत्याही परिस्थितीमध्ये गाव तळ्यात पाणी आणायचे आणि शेती फुलवायची हा निर्धार करण्यात आला. लोकांनी यासाठी लोकवर्गणी दिली. सर्व तरुणांनी एकसंधपणे राहून हे अत्यंत अवघड काम साध्य केले. त्यामुळे परिसरातील सुमारे साडेतीनशे हेक्टर क्षेत्र पुन्हा जिवंत होणार आहे.

– रविराज सोनवणे

- Advertisment -

ताज्या बातम्या