Thursday, April 25, 2024
Homeनगरएसटी कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची आमदार डॉ. तांबे यांची शासनाकडे मागणी

एसटी कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची आमदार डॉ. तांबे यांची शासनाकडे मागणी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

सणासुदीच्या काळामध्ये सुरू असलेल्या राज्यातील एसटी कर्मचार्‍यांच्या संपाबाबत राज्य शासनाने तातडीने भूमिका घेत त्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावे, अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहनमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

आमदार डॉ. तांबे यांनी केलेल्या मागणीत म्हटले आहे की, एसटी कर्मचारी हे सणासुदीच्या व अत्यंत अडचणीच्या काळात ही रात्रंदिवस काम करत असतात. त्यांचे वेतनही अल्प असते. त्यांची होणारी वार्षिक वेतनवाढ ही अल्प असते. म्हणजे कामाच्या मोबदल्यात त्यांना पुरेसा पगार मिळत नाही. याशिवाय आर्थिक परिस्थितीमुळे एसटी महामंडळ जे पगार करते ते वेळेत होत नाही. अशा सर्व बाजूंनी हे एसटी कर्मचारी अडचणीत सापडले आहेत.

त्यामध्ये अनेकांची आर्थिक कुचंबणेमुळे कुटुंबाचे हाल होत आहेत. आर्थिक विवंचनेमुळे काही कर्मचार्‍यांनी आत्महत्या सुद्धा केली आहे, हे अत्यंत दुःखदायक आहे. अशा वेळी महाराष्ट्र शासनाने तातडीने पुढाकार घेत या कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी काढावे अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री नामदार अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे.

आमदार डॉ. तांबे यांनी केलेल्या या मागणीबाबत एसटी महामंडळ संघटना व नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर या विभागातील एसटी कर्मचार्‍यांनी आमदार डॉ. तांबे यांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या