शिक्षणशास्त्र अध्यापक विद्यालयांना मिळेना विद्यार्थी; अनेक विद्यालयांना लागले टाळे

jalgaon-digital
3 Min Read

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

बारावीचा निकाल लागून महिना उलटला आहे आणि अध्यापक विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया कालावधी संपुष्टात येतो आहे. तरीदेखील क्षमतेच्या दहा-पंधरा टक्के जागा देखील भरू शकलेल्या नाहीत. एकीकडे आय.टी.आय साठी लाखो विद्यार्थ्यांच्या उड्या सुरू असताना डी.टी.एड साठी मात्र विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद च्या वतीने राज्यातील डी. टी. एड प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदरची प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली असली, तरी विद्यार्थ्यांचा ओढा मात्र याकडे दिसत नाही. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 47 अध्यापक विद्यालय सध्या अस्तित्वात आहेत. त्यापैकी 35 अध्यापक विद्यालयांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पाच अध्यापक विद्यालय अनुदानित आहेत, तर तीस अध्यापक विद्यालये विनाअनुदानित आहेत. या अध्यापक विद्यालयांमध्ये 1930 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यात ऑनलाईन स्वरूपात 299 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी 193 पूर्णत्वाला गेले आहे. 53 विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये उणीवा दिसून आल्या आहेत. 53 अर्जांवर प्रक्रिया सुरू आहे.

विद्यार्थ्यांचा ओढा आटला

राज्यात एकेकाळी एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थी क्षमता असलेला हा अभ्यासक्रम आता अवघा काही हजारांवरती आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही 74 अध्यापक विद्यालयांमध्ये अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू होती. मात्र ती आता अवघी 45 वरती घेऊन ठेपली आहे. मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांचा ओढा या अभ्यासक्रमाकडे आला असल्याने अध्यापक विद्यालयासमोर प्रश्न निर्माण झाले आहेत. एकीकडे आय.टी.आय सारख्या अभ्यासक्रमाला पूर्वी विद्यार्थी पसंती देत नव्हते. मात्र यावर्षी दोन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाला अर्ज सादर केले आहेत. डी. टी. एड पेक्षा अधिक पसंती देत असल्याचे चित्र आहे.

29 पर्यंत मिळणार प्रवेश

महाराष्ट्रातील डी. टी. एड अभ्यासक्रमासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने 29 ऑगस्ट ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख निश्चित केली आहे. तर तीस तारखेपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संबंधित अर्ज पडताळणी करून अंतिम करणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन अहमदनगर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डी. डी. सूर्यवंशी, विभाग प्रमुख बाबुराव कांबळे, नितीन टिळेकर यांनी केले आहे.

का मिळत नाही विद्यार्थी ?

एकेकाळी या अभ्यासक्रमासाठी लाखो रुपयांच्या देणग्या देऊन आणि गुणवत्तेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती प्रवेश घेत होते. मात्र शिक्षण हक्क कायद्याच्या अस्तित्वानंतर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट आली. परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण तीन ते चार टक्के राहिले आहेत. उत्तीर्ण झाल्याशिवाय शिक्षक म्हणून कोणत्याही संस्थेत नियुक्ती मिळत नाही. त्याचबरोबर राज्य सरकारने संपूर्ण शिक्षक भरती साठी पवित्र पोर्टल प्रक्रिया सुरू केली आहेत. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारे शिक्षक भरती होत असल्याने अनेकांना ही वाट अवघड वाटू लागली आहेत. त्याचा परिणाम म्हणून या प्रकाराकडे विद्यार्थ्यांचा ओढा आटत आहे. त्यातच मागील 10 वर्षातील लाखो विद्यार्थी अजूनही नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *