Thursday, April 25, 2024
Homeनगरपावनखिंड मोहिमेत संगमनेरकर होणार सहभागी

पावनखिंड मोहिमेत संगमनेरकर होणार सहभागी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र तर्फे पन्हाळगड-पावनखिंड मोहिमेचे करोना आपत्तीनंतर प्रथमच आयोजन होत आहे. गेल्या तीस वर्षांपासून वीर शिवा न्हावी काशिद, वीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, शंभुसिंग जाधव या शूर विरांच्या धारातीर्थाचे शौर्यपूजन करण्यासाठी तमाम महाराष्ट्रातून हजारो शिवभक्त शिवराष्ट्रच्या झेंड्याखाली पावनखिंडीत येत असतात. शिवराष्ट्रचे राज्याध्यक्ष प्रशांत साळुंखे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली अतिशय नियोजनबद्धपणे याही वर्षी ही मोहीम पार पडणार असल्याची माहिती शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्रचे संस्थापक सल्लागार आणि शिवव्याख्याते दीपकराव कर्पे यांनी दिली.

- Advertisement -

याही वर्षी 9,10 व 11 जुलैला पन्हाळा ते पावनखिंड अशा पंचावन्न किलोमिटरच्या धारकर्‍यांच्या वारीमध्ये संगमनेर मधून शिवराष्ट्र आणि आधार परिवाराचे पन्नास ते साठ शिलेदार आणि रणरागिनी भर पावसात निघायला सज्ज झाल्याची माहिती शिवराष्ट्रचे अहमदनगर जिल्हा प्रमुख संतोष शेळके, आधारचे समन्वयक डॉ. महादेव अरगडे, सुखदेव इल्हे, विठ्ठल कडूस्कर, लक्ष्मण कोते यांनी दिली.

पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी ज्या दिवसाची निवड करून जो मार्ग त्यांनी निवडला होता. तोच काळ आणि तोच मार्ग धरून ही धारकर्‍यांची वारी भर पावसातून, चिखलातून- डोंगर दर्‍यातून- अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिवरायांचा जयघोष करत मार्गक्रमण करत असते.

पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांच्या मनातील विठ्ठलभक्ती आणि पावनखिंडीत जाणार्‍या धारकर्‍यांच्या मनातील शिवभक्ती यांचा एक पवित्र संगम यावर्षी पाहायला मिळणार आहे. या मोहिमेत महाराष्ट्रासह देशभरातील शिवभक्त सहभागी होणार असून नगर जिल्ह्यातील बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या