Saturday, April 27, 2024
Homeनगरपाथर्डी उपजिल्हा रूग्णालयात 108 रूग्णवाहिका सेवेत हलगर्जीपणा

पाथर्डी उपजिल्हा रूग्णालयात 108 रूग्णवाहिका सेवेत हलगर्जीपणा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयातील 108 रुग्ण वाहिकेची सेवा देताना कर्मचारी हलर्गीपणा तसेच टाळाटाळ करत असल्याने सर्वसामान्यांना खाजगी रुग्णवाहिकांची मनमानी सहन करावी लागत आहे. यामुळे 108 रुग्णवाहिकेच्या कर्मचार्‍यावर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी केली.

- Advertisement -

मागणिचे निवेदन त्यांनी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक, पोलीस निरीक्षक पाथर्डी यांना दिले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात सोनटक्के यांनी म्हटले आहे की, पाथर्डी तालुक्यातील 108 रुग्णवाहिकेची सेवा म्हणजे रुग्णांसाठी असून अडचण नसून खोळंबा अशी झालेली आहे. रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत म्हणून ही सेवा देण्यात येते. परंतु उपजिल्हा रुग्णालयात या सेवेचा बोजवारा उडाला असून फायदा होण्याऐवजी सर्वसामन्य, गरीब रुग्णांचे नुकसानच अधिक होत आहे. 108 रुग्णवाहिकेस फोन लावल्या नंतर गाडीच उपलब्ध नाही. अडीच ते तीन तासांनी येईल किंवा तालुक्यातील दुसरी गाडी मागवून घेऊ परंतु तिला येण्यासाठी किमान 2 तासांचा वेळ लागेल किंवा आपली इच्छा असल्यास खाजगी गाडीची सोय करून रुग्णाला घेऊन जा अशी उडवाउडवीची उत्तरे कॉल सेंटर वरून मिळत आहेत.

कधी कधी गाडी दवाखान्याच्या पाठीमागच्या बाजूला उभी असते परंतु गाडी पाथर्डीमध्ये नाही असे सांगितले जाते. मग 108 या सेवेचा उपयोग काय ? अपघात झाल्यावर किंवा तातडीची गरज असताना गाडी कधीच वेळेवर उपलब्ध होत नाही. संबंधित गाडीवरचे डॉक्टर हे घरी किंवा अन्य ठिकाणी असतात गाडी बरोबर ते कधीही आढळून येत नाहीत. असा सर्व सावळा गोंधळ चालू असल्यामुळे कधी कधी रुग्ण दगावला जातो. ज्या व्यक्तीला अपघात झाला त्याला मदत करण्याऐवजी त्याची ससेहोलपट केली जाते. आधीच हतबल झालेल्या रुग्णाचे व त्याच्या नातेवाईकाचे आणखी हाल होऊन रुग्णाला कधी कधी विनाकारण नगर या ठिकाणी पुढील उपचारासाठी हलविले जाते. त्यातच भरीस भर म्हणून रस्ता खराब असल्यामुळे 108 चे कर्मचारी गाडी कधी कधी पांढरी पूल मार्गे घेऊन जातात व त्यामुळे वाटेतच रुग्ण दगावला जातो.

रुग्णाच्या नातेवाईकाला रुग्णालयाचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व खाजगी रुग्ण वाहिकेचे चालक संबंधित संपूर्ण यंत्रणा लिंक करून त्यांना खाजगी रुग्ण वाहिकेची सेवा घेण्यास भाग पाडले जाते. खाजगी रुग्ण वाहिका व कर्मचारी यांच्या मधल्या लागेबांध्यामुळे सदर रुग्णाच्या नातेवाईकाची आर्थिक लूट केली जात आहे. याचा गांभीर्याने विचार होऊन पाथर्डी येथील रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या डेपोटेशनवर बदल्या करण्यात याव्यात, रुग्णाची होणारी आर्थिक लूट थांबविण्यात यावी. येत्या 15 दिवसांत यावर कार्यवाही न झाल्यास रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात मोर्चा ,धरणे किंवा आंदोलन करण्यात येईल व त्याच्या होणार्‍या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही आपल्या कार्यालयावर असेल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात खाजगी रुग्णवाहिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात रुग्णांकडून आर्थिक व्यवहार सुरू आहेत. मनमानी रक्कम खाजगी रुग्णवाहिकांच्या मालकाकडून होत आहे. खाजगी रुग्णवाहिकेच्या वाहतुकीसाठी लागणारे परिवहन विभागाचे परवाने या संबंधित चालकाकडे नसून अवैधरित्या वाहतूक करण्यात येते. याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार केली जाणार आहे.

– अरविंद सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

- Advertisment -

ताज्या बातम्या