पाथर्डी-शेवगाव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीचे ग्रहण

खरवंडी कासार |वार्ताहर|Kharwandi Kasar

पाथर्डी-शेवगाव तालुक्यात भाजपा अंतर्गत गटबाजी उफाळून आली असून आमदार व जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्यात

दुही निर्माण करण्याचा काही राष्ट्रवादी प्रणित कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. शेवगाव तालुका हा पंचवीस वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात असताना गेल्या सहा वर्षांपासून यावर भाजपाने वर्चस्व मिळविले आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंढे यांच्या प्रेरणेने व माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघात आगेकुच चालू असताना आता आमदार मोनिकाताई राजळे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अरुण मुंढे यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू झाल्याने भाजपाला गटबाजीचे ग्रहण लागले आहे.

येणार्‍या नगरपरिषद व स्थानिक संस्था निवडणुकीत याची आयतीच संधी राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता असुन त्यादृष्टीने राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केली आहे तर नगरपरिषद ही राष्ट्रवादीच्या ताब्यात असावी, अशी वर्षानुवर्षे इच्छा असणारे भाजपाचेच राष्ट्रवादी प्रणित कार्यकर्ते या तयारीला लागल्याने गटबाजीला सुरुवात करून दिल्याची चर्चा आहे वास्तविक जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे हे भाजपाशी एकनिष्ठ आहेत.

विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रामाणीक काम केल्याचे सर्वश्रुत आहे तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत एकही उमेदवार निवडून आला नसताना नगरपरिषदेची सत्ता काबीज करण्यास आ. राजळे व मुंढे यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र त्यावेळी राष्ट्रवादी प्रणित कार्यकर्ते पडद्याआडून विरोधाची भूमिका बजावत होते, असे असताना आज आमदार व जिल्हाध्यक्ष यांच्यात कोण व कुणाच्या इशार्‍यावर दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

गांधी जयंतीनिमित्त झालेल्या घनकचरा व सफाई अशा दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांत भाजपात दुही निदर्शनास आली आहे. जिल्हाध्यक्ष व नगरपरीषद गटनेते यांच्या प्रभाग क्रमांक 6 व 7 मध्ये भाजपा शहराध्यक्ष सुरवसे व भाजपचे नगरसेवक अशोक आहुजा यांनी जिल्हाध्यक्ष व गटनेते तथा संबंधित प्रभागाचे नगरसेवक यांना निमंत्रीत न करता भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे यांच्या उपस्थितीत कोव्हिड कॅम्पचा कार्यक्रम घेतला.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त घनकचरा उद्घाटन कार्यक्रम हा आ.मोनिका राजळे यांच्या शुभहस्ते असताना त्यावर बहिष्कार टाकण्यात आला व याचवेळी वेगळा कार्यक्रम घेण्याची चाल खेळली गेली. हा सर्व प्रकार भाजप संघटनेत दुही निर्माण करण्याचा असून राष्टवादीचे घुले प्रणित भाजपचे काही कार्यकर्ते पुन्हा आपल्या पूर्वपदावर सक्रीय झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नगरपरीषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात देण्याच्यादृष्टीने ही सर्व उठाठेव चालली आहे काय? अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *