Friday, April 26, 2024
Homeनगरदहा दिवसांपासून पाथर्डी शहराचा पाणी पुरवठा बंद

दहा दिवसांपासून पाथर्डी शहराचा पाणी पुरवठा बंद

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

ऐन उन्हाळ्यात आणि करोना संकटात दहा दिवसांपासून पाथर्डी शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून येत्या दोन दिवसांत शहराचा पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पालिकेच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा ‘आप’चे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे, नागनाथ गर्जे, सुनील पाखरे यांनी दिला आहे.

- Advertisement -

पालिकेचे मुख्याधिकारी अधिकारी यांची आपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भेट घेतली. यावेळी शहर व उपनगराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी कोरडगाव चौकात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असतांना फुटल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पाईपलाईन दुरूस्तीचे काम सुरु असून लवकरच पाणी पुरवठा सुरुळीत केले जाईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

मात्र, दुरूस्तीचे काम करणारा सबंधित ठेकेदार गंभीर नसून यामुळे त्याच्यावर कारवाई करा. वास्तविक पाहता शहरामध्ये पिण्याचे पाणी गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पूर्णपणे बंद आहे. पिण्याच्या पाण्याची पाईपलाइन फुटली असता ती तात्काळ एका दिवसात दुरुस्त करणे गरजेचे होते. परंतु पालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक जनतेला वेठीस धरण्यासाठी पिण्याचे पाणी पाईपलाईन जोडली नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.शहरासह तालुक्यात लॉकडाऊन आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई असून दुसरीकडे पिण्यासाठी पाणी नाही. हा सर्व प्रकार तोंड दाबून बुक्याचा मार पालिका प्रशासन करत आहे.

यामुळे पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात येवून ठेकेदारी आणि टक्केवारी मिळवण्यासाठीच कामे केली जातात का ? टक्केवारी न मिळणारी कामे करायचीच नाहीत का असा सवाल यावेळी विचारण्यात आला. शहरातील जनतेला पिण्याची पाण्याची दुसरी व्यवस्था नाही. यामुळे तात्काळ पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा. अंदाजपत्रकानुसार काम केले जात नसल्याने संबंधीत ठेकेदाराकडून काम काढून नवीन ठेकेदारास काम द्यावे. काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने या कामाचे देयके अदा करू नये. जनतेला वेठीस धरणार्‍या ठेकेदारावर आठ दिवसांत कारवाई केली नाही कोणतीही पूर्व सूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा आपचे आव्हाड यांनी दिला आहे.

पाथर्डी शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असतांना फुटली आहे. पालिकेच्या टाकीपर्यंत पाणी देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून होते. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेकडे आहे. लॉकडाऊन असल्यामुळे दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य उपल्बध होण्यास अडचण होत आहे. हे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी मी व माझे सहकारी कामावर लक्ष ठेऊन अधिकारी व ठेकेदाराच्या संपर्कात आहोत.

– डॉ. मृत्युंजय गर्जे, नगराध्यक्ष पाथर्डी.

- Advertisment -

ताज्या बातम्या