Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकग्रामस्थांचा ऐतिहासिक निर्णय; लोकनियुक्त सरपंचावरील अविश्वास ठराव फेटाळला

ग्रामस्थांचा ऐतिहासिक निर्णय; लोकनियुक्त सरपंचावरील अविश्वास ठराव फेटाळला

पाटणे | वार्ताहर

मालेगाव तालुक्यातील पाटणे येथील लोकनियुक्त सरपंच राहुलाबाई अहिरे यांच्या विरोधात मंजूर झालेला अविश्वास ठराव आज झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी फेटाळून लावला आहे.

- Advertisement -

या घटनेमुळे लोकनियुक्त सरपंचाचे पद ग्रामस्थचं अबाधित राखू शकतात याचा प्रत्यय आला आहे. आज सकाळी लोकनियुक्त सरपंच अहिरे यांच्याविरोधातील अविश्वास ठरावास संमती देण्यासाठी तहसीलदार चंद्रजीतसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामसभेत १०९ मतांनी अविश्वास ठराव फेटाळला गेला.

यामुळे राहुलाबाई आहिरे यांचे सरपंचपद पाटणे ग्रामस्थांनी अबाधित ठेवल आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. जिल्ह्यात पाटणे ग्रामस्थांचा निर्णय हा ऐतिहासिक ठरला असून ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला असताना ग्रामस्थांनी एका महिलेचा सन्मान करत पद अबाधित राखल्याने ग्रामस्थांच्या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.

आज सकाळी ७ ते १० या वेळेत १३३३ मतदारांनी मतदानासाठी नाव नोंदणी केली. त्यानंतर ११ ते २ या कालावधीत मतदान घेण्यात आले. १३३३ पैकी १२३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी अविश्वास ठरावाच्या बाजूने ५३० मते व अविश्वास ठरावाच्या विरूद्ध ६३९ मते मिळाली. ६८ मते बाद (अवैध) झाली.

तहसीलदार चंद्रजीतसिंह राजपूत यांनी १०९ मतांनी अविश्वास ठराव बारगळल्याचे घोषित केले. निकालाची घोषणा होताच सर्व समर्थकांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण केली.

युवा नेते डॉ.अद्वय हिरे व पाटणे पंचायत समिती सदस्य अरुण संतोष पाटील, लकी खैरनार यांच्या नेतृत्वाखाली सरपंच राहुलाबाई आहिरे, ग्रामपंचायत सदस्य नथू खैरनार, संदेश खैरनार, नंदाबाई अहिरे, सुभाष आहिरे, कैलास शेवाळे, मधुकर धनवट, कैलास खैरनार, प्रभाकर शेवाळे, तुषार वाघ,विजय चव्हाण, रामा रौंदळ, नाना निकम, शांताराम खैरनार, प्रकाश पगारे, पंडित रौंदळ, कृष्णा वाघ, राजेश धनवट, संजय बागुल आदी कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले. ग्रामस्थांचे तसेच तरुणांचे विशेष योगदान या निवडणुकीत लाभले.

ग्रामपंचायत सदस्यांच्या राजकारणाचा फटका गावविकासास बसतो. अडचणी निर्माण होतात; परंतु थेट लोकनियुक्त सरपंचामुळे विकासाला चालना मिळते. तसेच महिला सरपंचावर अन्याय होऊ नये म्हणून पाटणे येथील ग्रामस्थांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. १२ ग्रामपंचायत सदस्यांच्या विरोधात ४ ग्रामपंचायत सदस्यांनी ही लढाई ग्रामस्थांच्या मदतीने जिंकली.

पाटणे ग्रामपंचायत सदस्यांनी राहुलाबाई अहिरे यांच्या विरोधात १२ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठरावाची मागणी केली होती. तहसीलदार चंद्रजितसिंग राजपूत यांनी विशेष सभा घेतली होती.

त्यांत १२ विरूद्ध ४ मतांनी अविश्वास ठराव पारित करण्यात आला होता. पुढील कार्यवाहीसाठी अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आला होता. त्यानुसार, आज विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

पाटणे येथील लोकनियुक्त सरपंचावरील विशेष ग्राम सभेतील अविश्वास ठराव फेटाळला गेल्याची नाशिक जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागून होते सरपंचांनी आपले पद ग्रामस्थांच्या आशिर्वादाने अबाधित ठेवले.

यावेळी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, सरपंच राहुलाबाई अहिरे, कैलास खैरनार, अशोक वाघ यांनी मनोगत व्यक्त केले व ग्रामस्थांचे आभार मानले. पंचायत समिती सदस्य अरुण पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

विशेष ग्रामसभेचे आयोजन तहसीलदार चंद्रजीतसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाने नायब तहसीलदार सोमनाथ खैरे, शेखर आहिरे,राहुल देशमुख, मंडळ अधिकारी एच.डी .काळे, दौलत गणोरे, एस .पी. विधाते, आर .वाय .पवार, योगेश पाटील तसेच ४ तलाठी ,शिपाई , कोतवाल यांनी मदत केली.

कायदा व सुव्यवस्था सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाने २० पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

निवडणूक प्रक्रियेस ग्रामविकास अधिकारी रमेश द्यानद्यान,सतीश खैरनार, सचिन बागुल, पंकज वाघ, प्रसाद बच्छाव यांचे सहकार्य लाभले. एकूणच अविश्वास ठरावाच्या विरोधात ग्रामस्थांनी साथ दिल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालाने वेधून घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या