Saturday, April 27, 2024
Homeनगरपारनेरचे पोलीस अडले तांत्रिक तपासात

पारनेरचे पोलीस अडले तांत्रिक तपासात

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यातील जवळा येथे शालेय मुलीचा बलात्कार करून खून केल्याच्या घटनेला चार दिवस ओलांडूनही पोलिसांना या घटनेचा उलगडा करता आलेला नाही. पोलिसांचा तपास फॉरेन्सिक व पोस्टमार्टम अंतिम अहवालावर आडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

- Advertisement -

या प्रकरणात जवळपास 20 व्यक्तींची कसून चौकशी पोलिसांनी केली असून, त्यामध्ये काही धागेदोरे मिळाले असले, तरी तो तपासाचा भाग असल्याने त्याबाबत वाच्यता केली जात नाही. घटनेचा तपास तांत्रिक बाबींवर अवलंबून असल्याचे पोलीस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अत्याचार व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या लोकवस्ती असलेल्या ठिकाणी आरोपी येतात, बलात्कार व खून करून निघून जातात, हे मोठे भयावह असल्याने अनेक नागरिकांनी याचा धसका घेतला आहे. मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे जवळा ग्रामस्थांसह विविध संघटनांची पोलिसांविषयी नाराजी वाढत आहे.

चोपडा प्रकरणही अडकलेले

शिरूर येथील युवा उद्योजक चोपडा यांच्या संशयास्पद मृत्यूला महिन्याचा कालावधी होत आला असला तरी या गुन्ह्याचाही उलगडा पोलिसांना करता आलेला नाही. यामध्येही शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. तर पोलीस नेमके करतात काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जिवे मारण्यात आल्याने तालुक्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. घटना घडून 4 दिवस झाले, तरी आरोपी मोकाट आहे. पोलीस यंत्रणा तपासात कमी पडत आहे? गरीब कुटुंबाला न्याय मिळणार की नाही? न्याय न मिळाल्यास आंदोलन करू.

– अनिल शेटे, अध्यक्ष, शिवबा संघटना.

- Advertisment -

ताज्या बातम्या