विधानमंडळात संसदीय अभ्यासवर्ग.. नाशिककरांनी अनुभवली विधानमंडळाची अभ्यास वारी

jalgaon-digital
4 Min Read

नाशिक :

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे, मुंबई विधानमंडळ येथे शनिवार, दिनांक १८ जानेवारी, २०२० रोजी एकदिवसीय संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले. मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विबजाग, रामनिरंजन झुणझुणवाला महाविद्यालय, घाटकोपर आणि नाशिक जिल्ह्यातील, राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, पत्रकार, अभ्यासक असे एकत्रित पंच्याहत्तर विद्यार्थी-प्राध्यापक या उपक्रमात सहभागी झाले.

अभ्यासगटास सर्वप्रथम निलेश मदाने (संचालक वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, विधान भवन तथा विधानसभा अध्यक्ष यांचे विशेष कार्य अधिकारी) यांनी विधानसभा, विधानपरिषद आणि मध्यवर्ती सभागृहाची भेट घडवत माहिती दिली. विधानमंडळातील सुसज्ज ग्रंथालयाचीही माहिती विद्यार्थ्यांनी करुन घेतली. आपल्या विधीमंडळाचा उज्वल इतिहास या ग्रंथात शब्दबद्ध करण्यात आला, तो विद्यार्थ्यांना चाळता आला.

त्यानंतर कायदा तयार करण्याची प्रक्रिया या विषयावर महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, विविध संसदीय आयुधे या विषयावर उप सचिव विलास आठवले आणि महाराष्ट्र विधानमंडळाची गौरवशाली परंपरा या विषयावर विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सर्व सहभागींनी प्रत्येक व्याख्यानाप्रसंगी समर्पक प्रश्न विचारत आपला उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.

वाघळे गावाचे (ता. बागलाण) उपसरपंच युवा नेतृत्व कुणाल पाटील यांच्या पुढाकाराने आणि वि. स. पागे संसदीय केंद्रातील सर्व सहकारी यांच्या योगदानाने हा एकत्रित संसदीय अभ्यास वर्ग यशस्वी झाला. विध्यार्थ्यांना आमदार झाल्याची फिल्लिंग आल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

सभापती, महाराष्ट्र विधान परिषद रामराजे नाईक-निंबाळकर आणि अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा नाना पटोले हे या केंद्राचे मार्गदर्शक असून त्यांच्या संकल्पनेनुसार असे ससंदीय अभ्यासवर्ग विधान भवन, मुंबई येथे नियमित आयोजित केले जातात. या अभ्यास दौऱ्यात कुणाल पाटील, स्नेहा सूर्यवंशी, प्रा. डॉ. सुरेंद्र मोरे, प्रा. ज्ञानोबा ढगे, नितिन पाटील, मानके, प्रा. डॉ. नानासाहेब गुरुळे, प्रा. ज्ञानेश्वर भगूरे, प्रा. मयूर उशीर, प्रा. दर्शना पाटील, प्रा. संगीता गुरुळे, रोशन भामरे, महेश मानके, रोशनी देशमुख, गोकुळ निंबाळकर, निखिल तोडकर, मयूर सोनवणे, प्रदीप उघडे, प्रशांत शिंदे, सनी लभडे, अंजिक्य मोरे, सागर ढेपले, सचिन वटणे, अंकित पवार, तेजस वाघ, हर्षल पगार, सविता आव्हाड, वैष्णवी शिरोडे आदी विद्यार्थी या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते.

संसदीय लोकशाहीत संसद हे सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचे निवारण करणारे सर्वोच्च सभागृह आहे. महाराष्ट्र विधांमंडळाला गौरवशाली इतिहास लाभला आहे. नवीन पिढीला भविष्यात राजकारणात काम करताना कायदेमंडळ, कार्यकारी मंडळचे कामकाज कसे चालते नीट कळावे, या सभागृहाचे गांभीर्य लक्षात यावे. म्हणून वि स पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्यावतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

-निलेश मदाने, संचालक वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, विधान भवन तथा विधानसभा अध्यक्ष यांचे विशेष कार्य अधिकारी

भारताला संसदीय लोकशाहीची उज्ज्वल परंपरा लाभली असून त्या बाबत पुढच्या पिढीला पुरेसे ज्ञान करून देणे गरजेचे आहे. म्हणून मी विधांमंडळाळशी संपर्क साधून नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यास दौरा आयोजित केला.

– कुणाल पाटील, आयोजक आणि उपसरपंच, वाघळे

हा एक स्तुत्य उपक्रम असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरित्या विधानमंडळाचे कामकाज कसे चालते हे यातून समजते. कायदे बनविण्याची प्रक्रिया, संसदीय आयुधे यांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरीत्या मिळते. राजकीय समाजीकरणाची प्रक्रिया गतिमान होऊन सक्षम नेतृत्व घडण्याची प्रक्रिया सुरू होते.

-प्रा. ज्ञानोबा ढगे, अभ्यास दौऱ्यात सहभागी प्राध्यापक

विधानमंडळ कामकाजा विषयी आम्हाला केवळ माध्यमातून माहिती मिळालेली असते. यात बऱ्याच प्रमाणात, कामकाज बंद पडले, बहिष्कार, सभागृह तहकूब अश्या नकारात्मक बाबीच जास्त पुढे येतात पण अभ्यास दौऱ्यातून बारा बारा तास सभागृहाचे कामकाज चालते हे या दौऱ्यातून कळाले, एखाद्या विधेयकावर किती गंभीर चर्चा होते ते समजले.

-गोकुळ निंबाळकर, विद्यार्थी

लोक प्रतिनिधी होणे ही काही साधी बाब नाही, निवडून येणे ही त्याचा एक भाग झाला जो आपल्या माहीत असतो परंतु खरी कसरत पुढे असते.जनतेच्या समस्या मांडणे, पाठपुरावा करणे, त्यासाठी सखोल अभ्यास, धोरण निर्मितीत सहभाग किती तरी गोष्टी लोक प्रतिनिधींची कसोटी लावणाऱ्या असतात. हे काम खूप गं भीर आहे.या आभ्यास दौऱ्यात हे कळाले.

– तेजस वाघ, विद्यार्थी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *