Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरपरळी पिपल्स सोसायटीमधील ठेवीदारांच्या ठेवी तातडीने द्या अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार

परळी पिपल्स सोसायटीमधील ठेवीदारांच्या ठेवी तातडीने द्या अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

परळी पिपल्स अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीमधील 11 कोटी 42 लाखांच्या अपहार प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. मात्र सर्वसामान्यांच्या ठेवी अद्याप परत मिळाल्या नाहीत. या सर्व संचालक मंडळ, पदाधिकार्‍यांच्या प्रॉपर्टी सील करुन त्याचा नियमानुसार लिलाव करुन या सर्वसामान्य ठेवीदारांचे ठेवी परत करण्यात याव्यात अन्यथा याविरुध्द तीव्र आंदोलन छेडण्यात येइल, असा इशारा महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष अंबादास हांडे यांनी दिला आहे.

- Advertisement -

काल महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष अंबादास हांडे यांच्यासह अन्य ठेवीदारांनी जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांची भेट घेवून निवेदन दिले व पोलीस प्रशासनाने या बँक पदाधिकार्‍यांविरुध्द कडक धोरण आखावे, अशी मागणी केली.

परळी पिपल्स अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीच्या जिल्ह्यात श्रीरामपूर, नेवासा, तिसगाव, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, गंगापूर, चितेपिंपळगाव आणि बीड जिल्ह्यातील केज येथे शाखा होत्या. सदर शाखांमध्ये ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवलेल्या आहेत. त्यांच्या ठेवींची मुदतपुर्ती होवुन ही पैसे परत मिळाले नाहीत.

श्रीरामपूर शाखेत ठेवलेले ठेवींची रक्कम मिळाली नसल्याने ठेवीदार संजय दत्तात्रय शिंदे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात चेअरमन, संचालक, मॅनेजर आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परळी पिपल्स अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीमधील 11 कोटी 42 लाखांच्या अपहार प्रकरणी नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने जनरल मॅनेजर विश्वजीत राजेसाहेब ठोंबरे व प्रमोद किसन खेडकर यांना अटक करण्यात आली होती. परंतु, या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी संस्थापक चेअरमन नितीन सुभाष घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी निखिलेश शिवकुमार मानुरकर यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांकडून फक्त कारवाई चालू आहे असे उत्तर दिले जाते. तरी पोलीस प्रशासनाने याप्रश्नाकडे जातीने लक्ष घालून ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर कसे मिळतील यादृष्टीने प्रयत्न करावेत व मोकाट फिरणार्‍या सर्व पदाधिकार्‍यांविरुध्द सक्त कारवाई करावी, अन्यथा याविरुध्द तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष अंबादास हांडे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या