Friday, May 10, 2024
Homeनगरश्रीगोंद्यातील ‘त्या’ शाळेची मान्यता काढली

श्रीगोंद्यातील ‘त्या’ शाळेची मान्यता काढली

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

पेपरफुटी, कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित शाळांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच शाळेची मान्यता देखील काढून घेतली जाईल. असा थेट इशारा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. सध्या राज्यात दहावी बोर्डाच्या परिक्षा सुरू आहेत. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी हे भाष्य केले आहे. शिक्षणमंत्री आज विधानपरिषदेत बोलत होत्या.

- Advertisement -

पुढे शिक्षणमंत्री म्हणाल्या की, शाळेत कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित शाळेला यापुढे केंद्र दिले जाणार नाही. पेपरफुटी, कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित शाळांवर कडक कारवाई केली जाईल. करोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होत आहे. बोर्डाच्या पहिल्याच पेपरमध्ये उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार घडत असल्याची घटना समोर आली. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पेपर फुटीप्रकरणी मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही शाळेत पेपर फुटीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाईल, अशी घोषणा काल विधान परिषदेत शिक्षणमंत्र्यांनी केली आहे.

दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे मराठीचा पेपरफुटीची घटना घडली होती. त्यावर देखील वर्षा गायकवाड यांनी भाष्य केले. त्या म्हणाली की, नगर जिल्ह्यातील ज्या शाळेत पेपर फुटीचे प्रकरण समोर आले त्याची मान्यता काढून घेण्यात आली आहे. या पुढे ज्या शाळेत पेपरफुटीचे प्रकरण समोर येईल त्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल. तसेच एखाद्या शाळेत कॉपीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांना यापुढे परीक्षा केंद्र दिले जाणार नाहीत.

यासोबतच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी एक तास अगोदर पोहोचावे. सकाळी 10.30 चा पेपर असल्यास 9:30 वाजता तर दुपारी तीन वाजता पेपर असल्यास दोनला पोहोचावे. परीक्षेला उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी करूनच परीक्षा केंद्रात सोडले जाणार आहे.

पुढे वर्षा गायकवाड म्हणाल्या की, परीक्षेसंदर्भात गैरसमजाचे वातावरण पसरू नये दहावीचे विद्यार्थी हे राष्ट्राच्या आणि देशाचे भवितव्य आहेत. त्यांना निर्भीडपणे परीक्षा देण्यासाठी वातावरण निर्माण करावे. शाळा तिथे परीक्षा केंद्र दिल्याने राज्यात या वेळी दहावीच्या परीक्षेला मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्र वाढलेले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त अधिक देण्याची विनंती आम्ही केलेली आहे. जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी यासाठीची माहिती घेऊन परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे गायकवाड म्हणाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या