तहान भागवणारी पाणपोईच तहानेने व्याकूळ…

देवळाली कॅम्प । Deolali Camp

येथील लेविटमार्केट मध्ये येणाऱ्या ग्राहक व व्यपरी वर्गाची तृष्णा भागविण्यासाठी 1996 मध्ये कॅन्टोन्मेंट प्रशासन यांचे परवानगीने रोटरी क्लब कडून उभारण्यातआलेली पाणपोई शेवटच्या घटका मोजत असून गेल्या 10 वर्षी पासून यातील पाण्याचा वापर केला जात नसल्याने रोगराईला निमंत्रण मिळत असल्याचे व्यपारी व नागरीक सांगत आहेत

देवळाली कॅम्प शहरात लेव्हीट मार्केट च्या प्रवेश द्वारा जवळ रोटरी क्लबच्या माध्यमातून रोटेरियन मणिभाई दोशी यांच्या स्मरणार्थ १९९६ साली पाणपोई उभारण्यात आली आहे. मात्र तिच्याकडे वेळोवेळी लक्ष न दिल्याने आज हि पाणपोई असून नसल्यासारखी अवस्था झाली आहे.

या पाणपोईवरील टाकी बऱ्याच दिवसांपासून स्वच्छ करण्यात आली नाही. याशिवाय पाणी वाहून जाण्यासाठी असलेला पाइपही तुटल्याने पाणी बाहेर वाहते. याशिवाय रात्रीच्या वेळी या पाण्याच्या टाकीजवळ मद्यपी रिकाम्या बाटल्या टाकून जात असल्याने दुर्गंधी येते.

पाण्यासाठी असलेले फिल्टर कॅन्टोन्मेंट प्रशासनाने काढून घेतले आहे. त्यामुळे नागरिक येथील पाण्याचा वापर पिण्यासाठी करत नसल्याचे चित्र आहे. पाणपोईच्या दोन्ही बाजूने कचऱ्याचा विळखा कायम असतो. त्यासाठी प्रशासनाने येथे डस्टबिन बसविणे गरजेचे आहे.

पाणपोई उभारताना बसवलेला मार्बल हा कोणत्याही क्षणी कोसळून दुर्घटना घडू शकते, अशी अवस्था झाली आहे. प्रशासनाने तातडीने या पाणपोईची दुरुस्ती करत उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी येथे व्यवस्था करावी अशी मागणी येथील व्यापारी वर्गातून होते आहे.

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गरज सर्वाना असते, लेव्हीट मार्केट जवळील पाणपोईची कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुरवस्था झाल्याने येथील व्यापाऱ्यांसह येणाऱ्या ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होत आहे. येथील देवळाली कॅन्टोन्मेंट प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पिण्याच्या पाण्यासाठी सदर टाकी पूर्ववत सुरु करने गरजेचे आहे.

-नितीन गायकवाड ,उपाध्यक्ष व्यपारी अससोसिएशन