Friday, April 26, 2024
Homeनगरपंजाब डख यांच्या हवामान अंदाजावर शेतकरी फिदा!

पंजाब डख यांच्या हवामान अंदाजावर शेतकरी फिदा!

अस्तगाव (वार्ताहर) – परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील अंशकालिन शिक्षक तथा हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तविलेल्या पावसाच्या अंदाजाचा मोठा फायदा महाराष्ट्रभर होत आहे. नगर जिल्ह्यातही शेतकर्‍यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून ते शेतकर्‍यांचे प्रबोधन करत आहेत.

पंजाब डख हे शेतकरी कुटुंबातील आहेत. टिव्हीवरील इंग्रजी व हिंदी बातम्या ते वडिलांबरोबर कायम पाहत असायचे. बातम्या संपल्यावर वडिलांबरोबर ते सातत्याने हवामानावर चर्चा करत असत. आपणही शेतकर्‍यांना हवामानाचा अंदाज का देऊ नये, असे त्यांना वाटत असतानाच हवामानाबाबत त्यांचे निरीक्षण सुरू झाले. त्यांनी पुढे 2000 साली सी-डॅक हा संगणकाचा कोर्स केला. या कोर्सनंतर ते उपग्रह संगणकावर बघायचे व निरीक्षण करून अंदाज व्यक्त करण्याची त्यांना आवड लागली. शेतकर्‍यांसाठी त्यांनी मेसेज सेवा सुरू केली. त्यांनी वर्तविलेले अंदाजाची शेतकर्‍यांना खात्री व्हायची. 2015-16 मध्ये अँड्रॉईड मोबाईल आले. आणि त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे शेतकर्‍यांची मदत वाढविण्याचे ठरविले. घरात बसून संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज वर्तविण्याची कल्पना आली आणि राज्यातील 36 जिल्ह्यांत 36 व्हॉट्सअ‍ॅपग्रुप तयार केले. आता विभागानुसार अंदाज वर्तविण्यासाठी तसेच जिल्हा, तालुका आणि आता गावाचाही हवामानाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

पंजाब डख यांचे राज्यभरात 560 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत. या प्रत्येक ग्रुपमध्ये 250 शेतकरी आहेत. राज्यातील 42260 गावात डख यांचे हवामानाचे मेसेज जातात. डख यांनी वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याने त्यांना शेतकर्‍यांचा वैयक्तिक रिप्लाय मिळत आहे.

शेतकर्‍यांचे किमान पावसाने नुकसान होऊ नये, पेरणी केव्हा करावी, पाऊस पुढे आहे का? याबाबतची कल्पना त्यांना नसते. आपण वार्षिक अंदाज 3 मार्चलाच व्यक्त करतो. आतापर्यंत वर्तविलेले अंदाज सुदैवाने खरे ठरले आहेत. गेल्या आठ वर्षापासून हे अंदाज फेल गेलेले नाहीत.

शेतकर्‍यांना गावोगाव जाऊन आपण दोन तास मार्गदर्शनही करतो. महिन्यात 30 हजार शेतकर्‍यांना भेटतो. सततच्या अभ्यासामुळे पर्यावणातील घटना, हवामानातील बदल यांचा चांगला अभ्यास झाला आहे. जसे की पश्‍चिमेला पावसाळ्यात आभाळ तांबडे दिसू लागले की, 72 तासांत पाऊस येणार हा अंदाज असतो. विजेच्या दिव्यावर किडे घोंगावू लागले की, 72 तासांत पाऊस येणार, विमानाचा आवाज येणे हेही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी महत्त्वाचे आहे. आंब्याचे प्रमाण जास्त होऊन आंबारस जास्त होत असेल तर दुष्काळाची ही चाहुल मानली जाते.

पाऊस कधी येणार? हे तारखेनुसार आणि वेळेनुसारही पंजाब डख सांगतात. त्यांच्या या अंदाजानुसार शेतकर्‍यांचा ओढा त्यांच्या हवामान अंदाजाकडे लागलेला असतो. पंजाब डख हे अंशकालिन शिक्षक आहेत. जिल्हा परिषदेकडे काम करतात. त्यांना 5 हजार इतके मानधन मिळते. परंतु दोन वर्षापासून कोविडमुळे तेही मिळत नाही. 10 एकर शेती आहे. शेतकर्‍यांना ते विनामूल्य मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी हवामानाच्या, पावसाच्या व्यक्त केलेल्या अंदाजावरून शेतकर्‍यांचे मात्र नुकसान टळते. पावसाचा अंदाज ते अगोदरच व्यक्त करत असल्याने शेतकरी सतर्क राहतात. पेरणी करावी की नाही? हेही समजते. पाऊस येणार पिके सुरक्षित राहातील यासाठी उपाययोजना करता येतात. गाराचा पाऊस कधी कोठे पडेल, असे शेतकरी हिताचे अंदाज ते गावानुसार, तालुक्यानुसार व्यक्त करतात. असे विखे कारखाना, गणेश कारखान्याचे शेतकी अधिकारी सुरेश चव्हाण यांनी सांगितले. ऊस तोडणीला या अंदाजाचा फायदा होतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या