Monday, April 29, 2024
Homeधुळेलक्झरीतून 11 लाखांचा पानमसाला जप्त

लक्झरीतून 11 लाखांचा पानमसाला जप्त

धुळे । प्रतिनिधी dhule

राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्यातील जिल्ह्यातून सर्रासपणे वाहतूक व विक्री सुरू आहे. त्यामुळे तरूण वर्ग गुटख्याच्या आहारी गेला आहे. ही बाब लक्षात घेवून जिल्हा पोलिस प्रमुख प्रविणकुमार पाटील यांनी गुटख्याची तस्करी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली असून दररोज कारवाईचा धडाका सुरू केला आहे. काल चाळीसगाव रोड पोलिसांनी ट्रकसह 67 लाखांचा गुटखा पकडल्यानंतर आज पुन्हा तालुका पोलिसांनी लक्झरीतून तब्बल 10 लाख 80 हजार 200 रूपयांचा विमल पानमसाला व तंबाखूचा साठा जप्त केला.

- Advertisement -

याप्रकरणी चालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही मोहिम सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी आज पत्रपरिषदेत दिली. ट्रॅव्हल्समध्ये (क्र.जी.जे.19 एक्स.9993) बेकायदेशीरपरणे विमल पानमसाला व तंबाखुचा माल भरून त्याची वाहतुक नेरमार्गे होणार असल्याची गोपनिय माहिती आज तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यावरून पोसई सागर काळे, पोहेकॉ पाटील, पोकॉ धिरज सांगळे, पोकॉ कुणाल शिंगाणे, पोना प्रमोद ईशी, पोकॉ सुमीत चव्हाण, पोकॉ ज्ञानेश्‍वर गिरासे यांच्या पथकाने पहाटे शोध घेवून सापळा रचून ट्रॅव्हल्सला पकडले.

तपासणी केली असता ट्रॅव्हल्समधून एकूण 25 मोठ्या गोण्यांचे पार्सल त्यात महाराष्ट्र राज्यात वाहतुक, साठा व विक्रीस प्रतिबंधीत असलेला विमल पानमसाला व व्ही-1 तंबाखु असलेला एकूण 10 लाख 80 हजार 20 रुपयांचा माल व वाहन असा एकूण 20 लाख 80 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच लक्झरी वाहनावरील चालक शेख लतीफ शेख अन्वर (वय 28 रा.ग्रीनपार्क कॉलनी, भडगाव जि.जळगाव), मॅनेजर नदीमखान असीफखान (वय 27 रा.भडगाव जि.जळगाव) व क्लिनर विकास सहादू महाजन (वय 28 रा.वरखेडी ता.चाळीसगाव) यांना ताब्यात घेतले.

पुढील कार्यवाही बाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला पत्र देण्यात आले असून गुन्हा नोंद करण्याची कारवाई केली जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पथकातील पोसई सागर काळे, पोहेकॉ प्रविण पाटील, पोकाँ धिरज सांगळे, कुणाल शिंगाणे, पोना प्रमोद ईशी, पोकॉ सुमीत चव्हाण, ज्ञानेश्‍वर गिरासे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या