Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपालघर जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करावी

पालघर जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करावी

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

पालघर जिल्ह्याच्या (Palghar district) आदिवासी संस्कृतीला आणि परंपरेला चालना देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने करावे. जिल्ह्यामध्ये वनसंपदा आहे. औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आहेत….

- Advertisement -

जिल्ह्यातील महत्त्वाचे फळ चिकू सातासमुद्रापार गेले आहे. वारली चित्रकला जगप्रसिद्ध आहे. या सर्व घटकांना गती देऊन जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली.

पालघर जिल्ह्यामध्ये औद्योगिकरण झाल्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आता जिल्ह्यातील उद्योग वाढावेत यासाठी उद्योजकांना विविध सवलती देऊन गुंतवणुक करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील नवीन सुसज्ज जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सुसज्ज इमारतीचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी बोलताना ठाकरे यांनी जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती आणि कला देशामध्ये प्रसिद्ध आहेत.

वारली चित्रकला तर जागतिक स्तरावर पोहचली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आदिवासी संस्कृती आणि जिल्ह्यातील परंपरा यांचे जतन करून विकासकामे करावीत. नवीन इमारतीचा नावलौकिक वाढवावा, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले.

जिल्ह्याला सागरी, डोंगरी भूभाग लाभला असल्याने नैसर्गिक आपत्तीचा धोका कायम असतो. तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यामध्ये नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून नुकसानग्रस्तांना मदतवाटपाचे काम सुरू आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने करोना काळात (Corona) केलेल्या उपाययोजनामुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली आहे.

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाने ऑक्स‍िजन प्रकल्प उभारला आहे. ऑक्स‍िजन बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. येणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक संकटात तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या काळात नवीन इमारतीचे लोकार्पण होत आहे. ही बाब अभिमानास्पद असून याइमारतीत येणाऱ्या नागरिकांची कामे तात्काळ होतील अशी दृढ इच्छा आपण मनामध्ये बाळगली तर ही भव्य सुसज्ज इमारत देशामध्ये आगळीवेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (ऑनलाईन), नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, सुनील भुसारा, राजेश पाटील, विनोद निकोले, रवींद्र फाटक, मुख्य सचिव सीताराम कुटे (ऑनलाईन), कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या