Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशइमरान खान यांची सत्ता थोडक्यात वाचली

इमरान खान यांची सत्ता थोडक्यात वाचली

दिल्ली | Delhi

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी राष्ट्रीय संसदेत बहुमत मिळवले आहे. अविश्वास ठराव प्रस्तावावर शनिवारी झालेल्या संसदीय निवडणूकीत इमरान खान यांनी बहुमत मिळवले आहे.

- Advertisement -

विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी इमरान खान यांना एकूण १७२ मतांची आवश्यकता होती. इमरान खान यांना १७२ मतं मिळाली. त्यानंतर सभागृह अध्यक्षांनी इमरान खान सरकार सुरक्षीत असल्याची घोषणा केली. पाकिस्तानच्या संसदीय इतिहासात इमरान खान हे दुसरे असे पंतप्रधान ठरले आहेत, जे स्वच्छेने विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले आणि त्यांनी तो ठराव जिंकलासुद्धा. या आधी १९९३ मध्ये नावाज शरीफ यांनी पंतप्रधान असताना पाकिस्तानच्या संसदेत अशाच प्रकारे विश्वासदर्शक ठरावाला स्वेच्छेने सामोरे जाण्याचे धाडस दाखवले होते.

दरम्यान, यापूर्वी विश्वासदर्शक प्रस्तावाच्या मतदानावेळी विरोधकांकडून संसदेत बहिष्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे इम्रान खान यांना दिलासा मिळाला होता. विश्वासदर्शक प्रस्ताव दाखल होण्यापूर्वीच इम्रान खान यांनी आपल्या खासदारांना पक्षाची भूमिका फॉलो करण्यास सांगितलं होतं. तसंच या प्रस्तावादरम्यान जो निर्णय येईल, तो आपल्याला मान्य असल्याचं खान म्हणाले होते.

या आठवड्याच्या सुरुवातीला पाकिस्तानचे अर्थमंत्री अब्दुल हफीज शेख सिनेट निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या संसदेत असलेल्या विरोधी पक्ष पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट पक्षाने पंतप्रधान इमरान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावरून विरोधकांनी रान उठवल्यानंतर इम्रान खान यांनी स्वत:च विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. विश्वासदर्शक मतदानावेळी पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटसह एकूण ११ विरोधी पक्षांनी सभात्याग केल्यामुळे विरोधकांशिवायच झालेल्या विश्वासदर्शक मतदानात इमरान खान विजयी झाल्याचं अध्यक्षांनी घोषित केलं. पाकिस्तानच्या संसदेचं कनिष्ठ सभागृह अर्थात तिथल्या लोकसभेमध्ये एकूण ३४२ सदस्य आहेत. त्यापैकी इमरान खान यांच्या सत्ताधारी तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे १५६ सदस्य आहेत. इथर सदस्यांच्या पाठिंब्यावर इमरान खान यांनी पाकिस्तानमध्ये सरकार स्थापन केलं आहे.

निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप

ज्या निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा इम्रान यांनी खासदारांना दिला होता, त्याच आयोगावर इम्रान यांनी आरोप केले होते. ‘तुम्ही वरिष्ठ पातळीवर भ्रष्टाचार होऊ दिला. सर्व काही तुमच्या डोळ्यासमोर झाले. मी सांगतो की, बाजार उघडला होता आणि लिलाव झाला. तुम्हाला सुप्रीम कोर्टानं संधी देऊनही तुम्ही फक्त 1500 मतपत्रिंकावर बार कोड का लावला नाही?’ असा आरोप इम्रान यांनी केला होता.

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं इम्रान यांचे हे सर्व आरोप फेटाळले होते. निवडणूक आयोगाने यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत म्हटले आहे की, खान यांनी केलेले आरोप धक्कादायक व निराशाजनक असून, सिनेट निवडणुका घटनेनुसारच घेण्यात आल्या. आम्ही आजवर कुणाचाही दबाव मानला नाही आणि भविष्यातही मानणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या