Wednesday, April 24, 2024
Homeनगरमहिलांनी परसबागेत गावरान वाणांची लागवड करावी - पद्मश्री राहिबाई पोपेरे

महिलांनी परसबागेत गावरान वाणांची लागवड करावी – पद्मश्री राहिबाई पोपेरे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जुने ते सोने, खणखणीत नाणे, या म्हणीप्रमाणे मी शेकडो फळे व भाजीपाला व कडधान्ये यांचे गावरान वाण जतन केले असून त्यांचे संवर्धन करीत आहे. गावरान वाणांच्या प्रचार व प्रसारासाठी यापुढेही काम सुरु ठेवणार असल्याचे सांगून किसान कनेक्टच्या उत्पादन विभागातील महिलांनी त्यांच्या परसबागेत गावरान वाणांची लागवड करावी, असा सल्ला बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी दिला. रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे व संकरित वाणांमुळे शेती, माती व मनुष्याचे आरोग्य धोक्यात येत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

- Advertisement -

येथील किसान कनेक्ट फार्मर प्रोड्युसर कंपनीच्यावतीने एमआयडीसी येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. किसान कनेक्टचे संस्थापक सारंगधर निर्मळ, किशोर निर्मळ व्यासपिठावर उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेऊन त्यांनी महिला व शेतकरी बचत गटाच्या सदस्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांचा श्रीमती पोपेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. किसान कनेक्ट फार्मर प्रोड्युसर कंपनीने दोन्हीही लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर थेट शेतकर्‍यांकडून फळे व भाजीपाला खरेदी करून मोबाईल अ‍ॅपद्वारे मागणी नोंदविण्याच्या सुविधेतून हजारो ग्राहकांना मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड व श्रीरामपूर या शहरात विक्री सुरु केली.

दीड वर्षात ग्राहकांची संख्या 1 लाखाच्याही पुढे गेली असून ज्यांच्या कडून फळे व भाजीपाला थेट पद्धतीने खरेदी केला जातो अशा शेतकर्‍यांची संख्या दोन हजारांच्या पुढे आहे. संगमनेर, मंचर, चाकण व नवी मुंबई येथे या शेतमालाची पॅकिंग सेंटर्सद्वारे मजबूत वितरण व्यवस्था उभी करण्यात आली असल्याचे किसान कनेक्टचे संस्थापक सारंगधर निर्मळ यांनी सांगितले.

याप्रसंगी अहमदनगर येथील आत्माचे प्रकल्प उपसंचालक राजाराम गायकवाड यांनी या योजनेबद्दल विस्तृत माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक श्रीधर बेलसरे यांनी मनोगत व्यक्त केले. मीनाक्षी बढे व पांडुरंग साळवे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी डॉ. विजया निर्मळ, निशा निर्मळ, घरगुती खाद्य पदार्थ निर्मिती विभागाच्या प्रमुख गौरी राजे, काशिनाथ गिर्‍हे, विवेक बरवट, गुणवत्ता विभागाचे सोमनाथ साळुंके, एचआर विभागाचे स्विन आहुजा, पुष्पक मोहाडकर, ऋषिकेश शेळके व कर्मचारी उपस्थित होते. रोहित मालकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या