Thursday, April 25, 2024
Homeनाशिकइगतपुरीच्या पूर्व भागात पावसाअभावी भात शेती संकटात

इगतपुरीच्या पूर्व भागात पावसाअभावी भात शेती संकटात

घोटी । जाकीर शेख

पावसाचे माहेर घर,नाशिकचे काश्मीर,भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात या वर्षी अजूनही दमदार पाऊस झालेला नाही.तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात काही प्रमाणात हजेरी लावणाऱ्या पावसाने इगतपुरीच्या पूर्व भागाकडे पुर्णतः पाठ फिरवली आहे.पूर्व भाग अद्यापही कोरडाठाक असल्याने शेतकऱ्यांकडे दुबार पेरणीचे संकट आहे.केवळ पावसामुळे भातशेती संकटात सापडली आहे.

- Advertisement -

मागील दहा दिवसांपूर्वी मुबंईत जोरदार पाऊस सुरू झाला होता या दरम्यान घाट माथ्यावरचा इगतपुरी तालुकाही पावसाकडे नजर लावून आहे.मुबंईत पाऊस सुरू झाला की इगतपुरी तालुक्यातही पाऊस येतो असा आज पावेतोचा अनुभव आहे.यंदा मुबंईत जोरदार पाऊस होत असतांनाही मात्र इगतपुरी तालुक्यात उदासींनताच आहे.तालुक्यात तुरळक स्वरूपात पाऊस झाला असला तरी तो संपूर्ण तालुक्यात अजिबात नाही.

इगतपुरी आणि घोटी परिसरापुरताच तो मर्यादित आहे.घोटी-इगतपुरी वगळता पूर्व भागातील टाकेदखेड,वासाळी,धामणगाव,परदेशवाडी,धामणी,पिंपळगावमोर,अडसरे,भरविर,अधरवड,सोनोशी,मायदरा,बारशिगवे आदी गावांसह वाड्या वस्त्यांमध्ये गेल्या वीस दिवसांपासून अद्यापही पाऊस नसल्याने या भागातील शेतकरी वर्ग पूर्णपणे धास्तावला आहे.

इगतपुरी तालुक्यात भाताचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जात असल्या कारणाने पश्चिम भागासह पूर्व भागातही अनेक शेतकऱ्यांनी महागडी बियाणे,खते,मजुरीचा खर्च,लागवडीचा खर्च करून भाताची लागवड केली आहे,भात रोपांची बऱ्यापैकी वाढ झाल्याने त्यांना दमदार पाऊसाची गरज आहे तर अनेक शेतकऱ्यांच्या भात रोपांना वाढीसाठी युरिया खतांची गरज आहे परंतु पाऊसच नसल्याने भात रोपांना खते सुद्धा देता येत नाही.दररोज कडक्याचे ऊन पडत असल्याने भात रोपे पिवळी पडून संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

लवकर पाऊस न झाल्यास भात रोपे वाळून जातील शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिल घोटी इगतपुरीसह पश्चिम भागात तुरळक पाऊस होत असला तरी तो भात शेतीसाठी इतर पिकांसाठी फारसा फायदेशीर नाही.अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील विहीर,शेततळे,बंधारा,ओहळ,नदीच्या पाण्यावर भाताची लागवड केली आहे परंतु आज अद्यापही पाऊस नसल्याने तालुक्यातील शेतकरी आजही भात शेतीला पूरक असलेल्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

शेतकऱ्यांसमोर कोरोनाचेही संकट

दमदार पाऊस होत नसल्याने अधीच चिंतेत असलेल्या इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचेही संकट आहे त्यात तालुक्यात घोटीसह कोरोनाचे संक्रमण ग्रामीण भागातीतही दिवसागणिक वाढत आहे.नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या इगतपुरी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.ग्रामीण भागात होत असलेला कोरोनाच्या शिरकाव यामुळे शेतकरी आणखी चिंतेत सापडला आहे.अनेकदा काही भागात कोरोना बाधित रुग्ण आढळले तर संपूर्ण गाव दहा पंधरा दिवस बंद राहत असल्याने शेतकऱ्यांची खते,बी बियाणे ,इतर शेती पूरक वस्तू घेण्यासाठी गैरसोय होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या