Friday, May 10, 2024
Homeनगरपाचेगाव-कारेगाव रस्त्यावर बेकायदेशीर वृक्षतोड

पाचेगाव-कारेगाव रस्त्यावर बेकायदेशीर वृक्षतोड

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील पाचेगाव-कारेगाव रस्त्यावरील वांगी हद्दीत होन वस्तीशेजारी नऊ वर्षापूर्वी लावलेल्या 40 ते 50 झाडांची खुलेआम कत्तल होत असताना संबंधित विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

झाडे लावा झाडे जगवा ही महाराष्ट्र शासनाची संकल्पना असताना कोट्यवधी रुपयांचा निधी वृक्ष लागवडीसाठी खर्च केला जात आहे. मात्र या मोहिमेला बेकायदेशीरपणे झाडे तोडून हरताळ फासला जात आहे. याबाबत पाचेगाव-कारेगाव या वांगी हद्दीतील नऊ वर्षापूर्वी शासनाने रस्त्याच्याकडेला लावलेल्या झाडांची सधन बागायतदारांकडून वीक एंडचा मुहूर्त साधून दिवसा ढवळ्या बेकायदेशीर कत्तल केली जात आहे. वारंवार होणारी वृक्षतोड संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या लक्षात कशी येत नाही, की शासकिय यंत्रणेने झोपेचे सोंग घेतले आहे हा चर्चेचा विषय ठरत आहे.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर पत्रकारांनी घटनास्थळाला भेट दिली असता झाडे कत्तल करणारे मजूर, ठेकेदार यांनी पत्रकारांना पाहून धूम ठोकली. पत्रकारांनी चौकशी केली असता संबंधित शेतकरी व झाडाची कत्तल करणारा ठेकेदार यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. एकीकडे शासन पर्यावरणावर कोट्यवधी रुपये खर्च करीत असून दुसरीकडे झाडांच्या अशा कत्तलीने पर्यावरणाचा र्‍हास होत आहे.

पाचेगाव-कारेगाव रस्त्यावरील शिरस जातीचे आठ ते नऊ वर्ष वयाचे (सेना सियामिया) 40 ते 50 झाडांची कत्तल झाली आहे. यापुर्वीही या रस्त्यावरील असंख्य झाडांची अनधिकृतपणे कत्तल झाली आहे. याची प्रशासन दखल घेत नाही. हा संशोधनाचा भाग आहे. सध्या प्राणवायूचे किती महत्त्व आहे हे करोना महामारीने पटवून दिले आहे. तरीही सरकारी कर्मचार्‍यांकडून याबाबत अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. ही खेदाची बाब आहे. यासंदर्भात निसर्ग प्रेमी हे आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

याबाबत श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून या प्रकरणात दोषी असणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश देण्यात येतील, असे सांगितले.

दिवसेंदिवस वाढत असलेली वृक्षतोड पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. ग्लोबल वार्मींगमुळे मानवजातीला असंख्य संकटांना सामोरे जावे लागत असतानाही शासकीय यंत्रणा वृक्षतोडीवर नियंत्रण आणू शकत नाही. यामुळे सरकारने अधिक कायदे कडक करून अशा गुन्हेगारावर गुन्हे दाखल केले पाहीजे.

– निसर्ग प्रेमी मोहन जगताप

- Advertisment -

ताज्या बातम्या