Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकसिन्नर : लॉन्स मालकांवर गुन्हे दाखल होणार

सिन्नर : लॉन्स मालकांवर गुन्हे दाखल होणार

सिन्नर । प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभुमीवर विवाह समारंभात केवळ ५० वर्‍हाडी उपस्थित राहण्यात परवानगी देण्यात आली असून यापेक्षा जास्त वर्‍हाडी आढळल्यास लॉन्स मालकासह वधू-वरांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राहूल कोताडे यांनी दिली. वाढदिवसाचे केक विकणार्‍या विक्रेत्यांना खरेदी करणाराचे नाव, पत्ता तहसिल कार्यालयास कळवणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून तालुक्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये येणारे अधिकारी कर्मचारी व नागरिकांची तपासणी करून त्यांच्या नोंदी ठेवण्यात येत आहेत. सिन्नर शहरातील ८ व ग्रामीण भागातील २६ कंटेनमेंट झोनमध्ये घरोघर जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये तालुक्याच्या ग्रामीण भागात ६० वर्षापेक्षा जास्त वयाचे व विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या १०,२२१ व्यक्तींची नोंदणी करण्यात आलेली आहे. या व्यक्तींची आरोग्य विभागामार्फत नियमित तपासणी करण्यात येणार आहे.

सिन्नर शहरांमध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीचे सर्वेक्षण करण्यासाठी १२३ पथके स्थापन केली असून बुधवार (दि.१) पासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सिन्नर शहरात स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात येत आहे. या कालावधीमध्ये सर्वे पूर्ण करण्यात येणार आहे. बुधवारी (दि.१) आमदार व उपविभागीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी १५ अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामस्तरीय समिती, पर्यवेक्षण अधिकारी व तालुकास्तरीय समिती अशी त्रिस्तरीय पध्दतीने कार्यवाही सुरू आहे.

लग्न समारंभात ५० पेक्षा अधिक व्यक्तींची मर्यादा मोडल्यास संबंधित मंगल कार्यालयाचे चालक, वधू- वर पक्षातील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील सर्व बेकरी चालकांकडून विक्री होणार्‍या वाढदिवसाच्या केक बाबत खरेदी करणार्‍याचे नाव व पत्ता तात्काळ स्थानिक प्रशासनास देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या