Thursday, April 25, 2024
Homeनगरथकीत वेतनासाठी घोगरगावसह 10 गावांच्या पाणीपुरवठा कर्मचार्‍यांचे उपोषण

थकीत वेतनासाठी घोगरगावसह 10 गावांच्या पाणीपुरवठा कर्मचार्‍यांचे उपोषण

नेवासा |शहर प्रतिनिधी|Newasa

तालुक्यातील घोगरगावसह इतर दहा गावांना पाणीपुरवठा करणार्‍या कर्मचार्‍यांना पंधरा महिन्यांपासून

- Advertisement -

पगार नसल्याने मोठी उपासमार होत असल्याने थकीत पगार मिळावा, या मागणीसाठी पाणीपुरवठा कर्मचार्‍यांनी नेवासा पंचायत समितीसमोर काल बुधवारी सुरू केलेले उपोषण अधिकार्‍यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर स्थगित करून सोडण्यात आले.

उपोषणाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सचिव दिलीपराव डिके, तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब गोर्डे, पाणीपुरवठा कर्मचारी संघटनेचे गणेश डावखर यांनी केले.

पाणीपुरवठा करणार्‍या कर्मचार्‍यांनी उपोषणप्रसंगी म्हटले की आम्ही सर्व पाणीपुरवठा कर्मचारी घोगरगावसह इतर दहा गावांना पाणीपुरवठा करत असून गेल्या पंधरा महिन्यांपासून आम्हाला वेतन न मिळाल्याने आमच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली असल्याने आम्हाला पंधरा महिन्याचे थकीत वेतन मिळावे म्हणून आम्ही उपोषणास बसलो आहोत.

घोगरगाव व इतर दहा गावांना पाणीपुरवठा करणारे कर्मचारी गणेश डावखर, सलीम बशीर शेख, हशमुद्दीन सरदार शेख, अशोक साठे, दत्तात्रय राऊत, अंकुश पठाडे, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे बाबासाहेब शेळके यांनी उपोषणामध्ये सहभाग घेतला होता.

यावेळी सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार व सदस्यांशी झालेल्या चर्चेनुसार गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे सहायक गटविकास अधिकारी नवनाथ पाखरे व प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे प्रशासक शिवराम सुपे यांनी पंधरा महिन्यांपैकी दोन महिन्यांचे वेतन येत्या सात दिवसांत देण्याची तरतूद करण्यात येईल तर उर्वरित वेतन एप्रिल 2021 अखेरपर्यंत देखभाल व दुरुस्ती अनुदान प्राप्त झाल्यानंतर देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.त्यानंतर उपोषण स्थगित करून ते मागे घेत असल्याचे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या