थकीत वीजबिलामुळे चांदा पाणीपुरवठा योजनेची वीज तोडली

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा तालुक्यातील चांदा येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याच्या विहिरीवरील थकीत वीज बिलासाठी वीज वितरणने पुन्हा एकदा वीजजोडणी तोडली असून ग्रामस्थांवर भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठ्याबरोबरच वीज वितरणने थकीत वीज देयकासाठी ग्रामपंचायत कार्यालयाचा वीजपुरवठाही खंडित केल्याने ग्रामपंचायत कारभारही ठप्प झाला आहे.

दोन महिन्यांपूर्वीच चांदा ग्रामपंचायतचा पाणीपुरवठाचे कनेक्शन थकीत वीजबिलासाठी वीज वितरणने तोडले होते. त्यावेळेस ग्रामपंचायतीने दोन्ही पाणीपुरवठ्याच्या विहिरींचे मिळून जवळपास एक लाख रुपये वीज बिल भरले. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा पाणीपुरवठाची वीज खंडित करण्यात आली आहे.

या संदर्भात ग्रामपंचायतीच्यावतीने दिलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर असलेल्या वीज वितरण कंपनीकडे भाडेपोटी मिळणारे बिल हे जवळपास साडे नऊ लाख रुपयांचे थकीत असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे. सदरची थकबाकी जवळपास चार वर्षांपासून थकलेली असल्याचे सांगण्यात आले.

वीज वितरणची ग्रामपंचायतीकडे जवळपास साडेतीन लाख रुपयांची थकबाकी आहे. तर ग्रामपंचायतीची वीजवितरणकडे नऊ लाखांच्या आसपास थकबाकी असल्याचे सांगितले जात आहे.

पाणीपुरवठ्याच्या कनेक्शन सोबतच वीज वितरणने चांदा ग्रामपंचायत कार्यालयाचाही वीजपुरवठा खंडित केल्याने चार दिवसांपासून कामकाज पूर्णतः ठप्प झाले होते. ग्रामपंचायतने वीजवितरणशी संपर्क केल्यानंतर कार्यालयाचा पुरवठा सुरळीत झाल्याचे समजते. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी अजूनही वीज वितरणकडून कुठलाही निर्णय झाला नसल्याने चांदा ग्रामस्थ भर पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. याबाबत चांदा ग्रामपंचायत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र वीज वितरण कडील थकबाकीची रक्कम ही मोठी असल्याने ग्रामपंचायतीकडे वीज वितरण ने त्याचा भरणा करावा अशी मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *