Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकुंदा बच्छाव यांना 'आउटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक' पुरस्कार

कुंदा बच्छाव यांना ‘आउटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक’ पुरस्कार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केवळ कौटुंबिक आर्थिक स्थिती सक्षम नसल्याने शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकल्या जाणार्‍या हुशार व होतकरू विद्यार्थिनींसाठी वैयक्तिक पातळीवर सुरू केलेल्या शैक्षणिक पालकत्वाच्या संकल्पनेला सामाजिक अभियानाचे स्वरूप देण्याच्या कार्याबद्दल कुंदा शिंदे बच्छाव यांना ‘नाशिक सिटीझन्स फोरम’ने (Nashik Citizens Forum )या वर्षातील पहिल्या तिमाहीचा ‘आउटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक’ पुरस्कार (Outstanding Citizen of Nashik’ Puraskar )जाहीर केला आहे.

- Advertisement -

नाशिकच्या उन्नती आणि उत्थानासाठी विविध क्षेत्रांत अविरतपणे कार्यरत असणार्‍या ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या कामाला दाद देण्यासाठी ‘नाशिक सिटीझन फोरम’ तर्फे गतवर्षीपासून ‘आउटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक’ या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. यापुढे दर तिमाहीत एका व्यक्तीला या पुरस्काराने गौरविण्याचा निर्णय फोरमने घेतला आहे. त्यानुसार जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीसाठी कुंदा बच्छाव यांची निवड करण्यात आली.

कुंदा शिंदे बच्छाव या नाशिक महानगरपालिकेच्या आनंदवली येथील शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या शाळेच्या परिसरातील 35 विद्यार्थीनींचे आठवीनंतरचे शिक्षण केवळ आर्थिक दुर्बल परिस्थितीमुळे खंडित झाले असल्याची बाब 2021 साली बच्छाव यांच्या निदर्शनास आली. या मुलींसाठी काहीतरी करण्याच्या तळमळीतूनच बच्छाव यांनी शैक्षणिक पालकत्व अभियानाचा प्रारंभ केला.

कुंदा बच्छाव यांनी 21 मे 2021 रोजी स्वतः तीन विद्यार्थीनींच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलत त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले. कुंदा यांच्या पतीनेही एक मुलीचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले. त्यांच्या सहशिक्षीका असलेल्या वैशाली भामरे यांनीही दोन आणि शिक्षक प्रशांत पाटील यांनी एक विद्यार्थीनीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. अशा अनेक हुशार व गरजू मुली असल्याने त्यांना वैयक्तिक पातळीवरील मदत पुरे पडणार नाही, या विचारातून श्रीमती बच्छाव व भामरे यांनी मुलींना समाजातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कर्मदान फाऊंडेशनची स्थापना करत ‘शैक्षणिक पालकत्व’ (एज्युकेशनल पॅरेंटिंग) हे अभियान सुरू केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

शिक्षण प्रवाहापासून 5 वर्ष दूर राहिलेल्या 2 मुली या अभियानामुळे 17 नंबरचा फॉर्म भरून 10वी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. तर 2 मुली एमपीएससी परीक्षेची तयारी करत आहेत. सुमारे 18 मुली 11वी कॉमर्स ला शिकत असून 15मुलींनी दहावीची परिक्षा दिली आहे. एक मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तर उर्वरीत मुली पदवीचे शिक्षण घेत आहेत. या उपक्रमातील अनेक मुलींनी दहावीत उत्तम गुण मिळवून आपापल्या शाळेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवले आहेत.

या अभियानात सहभागी होत तत्कालिन जिल्हाधिकारी सूरज मांढरे व पूजा राम लिपटे यांनी प्रत्येकी पाच, रोटरी क्लब ऑफ नाशिकने 8 तर इनरव्हील क्लब जेननेक्स्टने 20 विद्यार्थीनींचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले आहे. रणरागिणी मराठा ग्रुपनेही मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. या तर्‍हेने जवळपास दीडशेहून अधिक दाते कर्मदान परिवारास जोडले गेले आहेत.

आजवर मिळालेली मदत ही केवळ आर्थिकच नसून त्या बरोबर शैक्षणिक साहित्य, मुली व त्यांच्या पालकांचे वेळोवेळी समुपदेशन, त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणादायी संवाद, व्याख्यान या स्वरूपातही समाजाकडून योगदान मिळत आहे. या अभियानांतर्गत अशा गरजू पण अभ्यासात हुशार विद्यार्थिनींना स्वतःच्या पायावर उभे करणारे व त्यांना स्वावलंबी बनवणारे शिक्षण देण्यासाठी त्यांचा शैक्षणिक खर्च उचलतील, अशा संवेदनशील व दानशूर व्यक्तींना या विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालक म्हणून जबाबदारी देणे व त्यायोगे विद्यार्थिनींचे पुढील शिक्षण पूर्ण करणे या उद्दीष्टाने बच्छाव कार्यरत आहेत.अशा विद्यार्थीनींना पदवीपर्यंत किंवा व्यावसायिक शिक्षण मिळेपर्यंत आर्थिक सहकार्य करण्याचा त्यांचा हेतू आहे. पुढे जाऊन याच विद्यार्थिनी सुशिक्षित असल्यामुळे आदर्श महिला गृहिणी, माता बनून एक आदर्श कुटुंब व आदर्श समाज घडवतील, असे बच्छाव मानतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या